Dainik Maval News : मावळ तालुक्यात खरीप भात पिकाची कापणी वेगाने सुरू झाली आहे. तालुक्यात यंदा जवळपास 12 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेण्यात आले आहे. बहुतांश भात लागवडी जून आणि जुलै महिन्यात झाल्या असल्याने सध्या पीक कापणीसाठी तयार झाले आहे. परतीच्या पावसाने अखेरच्या टप्प्यात जोरदार दणका दिल्याने भाताच्या कापण्या रखडल्या होत्या, परंतु दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली आहे.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात मान्सून पावसाने जोर दिल्याने भात पिकास पोषक वातावरण झाले होते. सर्वच भात खाचरांमध्ये योग्य प्रमाणात पाणी साचून पीकही जोमात आले होते. परंतू मधल्या काळात भातावर करपा, कडा करपा आणि शेंडे करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सोबत आताही काही भागात पिकावर तपकिरी तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव झाला असून पिकाला धोका निर्माण झाला आहे.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जुलै महिन्यात झालेल्या लागवडीचे भात पीक आता पूर्णतः कापणीला आले आहे. तर पवन मावळ, नाणे मावळ, आंदर मावळच्या पश्चिम पट्ट्यात भात काढणी सुरू झाली आहे. काही ठिकाणी भात खाचरांमध्ये पाणी साठले असल्याने कापणीचा कालावधी लांबण्याची शक्यता आहे. तर तालुक्यात एकाचवेळी सर्व विभागात भात काढणी सुरु झाल्याने मजूर टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात महायुतीत बंडखोरी ! सुनिल शेळके यांच्या विरोधात अनेक दिग्गज एकत्र । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यातील ताजे गावातील सख्ख्या भावांची शासकीय सेवेत निवड । Maval News
– राज्यात 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, विविध विभागांच्या पथकांची राज्यभर कारवाई