Dainik Maval News : मावळ तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सध्या सुरु असून त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक निवडणूकीच्या कामाला लागले आहेत. मंगळवारी (दि.29) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी सोमवारपर्यंत एकूण चार उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र निवडणूक कार्यालयात दाखल केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. परंतु यात आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पार्टी पक्षाचे विधानसभा प्रमुख रविंद्र भेगडे यांनी देखील सोमवारीच त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गुरुवारी (दि.24) जोरदार शक्तीप्रदर्शन करीत सुनिल शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.25) गोपाळ तंतरपाळे यांनी देखील त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सोमवारी (दि.28) अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत रविंद्र भेगडे हेही होते. परंतु बापूसाहेब भेगडे यांच्या नंतर सोमवारीच रविंद्र भेगडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
रविंद्र भेगडे हे भारतीय जनता पक्षाकडून मावळ विधानसभेसाठी इच्छुक होते. परंतु महायुतीत मावळची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली, आणि रविंद्र भेगडे यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे नाराज झालेले रविंद्र भेगडे हे दोन दिवस नॉटरिचेअबल होते. परंतु सोमवारी बापूसाहेब भेगडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करीत असताना रविंद्र भेगडे हेही रॅलीत आणि व्यासपीठावर सहभागी झाले होते. त्यांनी आपला पाठींबा बापू भेगडे यांना जाहीर केला आहे. परंतु सोबत त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पर्याय क्रमांक दोन म्हणून दुसरा अर्ज –
अनेकदा उमेदवाराच्या अर्ज छाननीत त्याचा उमेदवारी अर्ज बाद होतो, अशावेळी पर्यायी उमेदवार किंवा बॅकअप म्हणून इतर उमेदवारांचे अर्ज दाखल केले जातात. कुठल्याही तांत्रिक चुकीमुळे मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास जागा रिक्त राहू नये किंवा समोरील उमेदवार बिनविरोध निवडून येवू नये यासाठी पर्याय क्रमांक दोन म्हणून दुसऱ्याही ताकदीच्या उमेदवाराचा डमी अर्ज भरला जातो. रविंद्र भेगडे यांनी देखील डमी अर्जच भरल्याची माहिती मिळत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आम्ही पक्षाचा आदेश मानणार, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार’ ; तळेगाव भाजपा पदाधिकाऱ्यांचा सुनिल शेळकेंना पाठींबा
– मावळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल । Maval Vidhan Sabha
– मावळात शरद पवारांचा अजितदादांना धक्का ! अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचं काम करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश