Dainik Maval News : ब्रिटीश काळापासून कार्यरत असलेल्या वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे स्थलांतर आता नव्याने बांधलेल्या प्रशस्त वास्तूत झाले आहे. श्री दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर शनिवारी (दि. 14 डिसेंबर) जुन्या चौकीच्या जवळच उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीत पोलीस ठाण्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली.
तालुक्याचे ठिकाण असलेले वडगाव शहर आणि शहरातील पोलीस ठाणे असलेले वडगाव मावळ पोलीस ठाणे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे. सुरुवातीला वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मावळातील वडगाव मावळ, कामशेत आदी मुख्य गावांसह पवन मावळ, आंदर मावळ आणि नाणे मावळ भागातील तब्बल 91 गावांचा समावेश होता.
परंतु नंतर झपाट्याने झालेले शहरीकरण, वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येत झालेली वाढ यामुळे कामशेत शहरात स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे 43 गावे कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट झाली आणि उर्वरित 48 गावांचा समावेश वडगाव मावळ पोलीस ठाण्यात करण्यात आला.
आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांतून नव्या वास्तूची निर्मिती –
सव्वाशे वर्षाहून अधिक काळ जुन्याच पोलीस ठाण्यातून सर्व कारभार चालवला जात होता. परंतु कामाचा वाढता व्याप, वाढता पोलीस फौजफाटा आणि तक्रारींचा ससेमिरा यांची सोडवणूक करण्यासाठी किंवा कामाचा झपाटा हाकण्यासाठी जुनी वास्तू कमी पडत असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी ओळखले. त्यामुळे पोलीस बांधवांची ही अडचण सोडविण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी विशेष पाठपुराव्याने वडगाव मावळ पोलीस ठाण्याची नूतन सुसज्ज इमारत उभारण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी कान्हे फाटा येथील रुग्णालयाच्या लोकार्पणावेळी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तेव्हा या पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचेही ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर जुन्या इमारतीमधील साहित्याचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर करून शनिवारी श्री दत्त जयंतीच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात आले.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या हस्ते पूजा करून नवीन इमारतीमध्ये कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, उपनिरीक्षक सुनील जावळे, बळीराम सांगळे, ऋतुजा मोहिते यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. नूतन इमारतीमध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, ठाणे अंमलदार यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष असून गोपनीय विभाग, महिला कक्ष, दोन कस्टडी, प्रशस्त पार्किंग अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड प्रकल्पाचे अद्यापही 200 हेक्टर भूसंपादन बाकी, ‘या’ जमीन मालकांना मिळणार 25 टक्के भरपाई । Pune Ring Road
– दोन्ही राष्ट्रवादी एकत्र… आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याने खळबळ, राज्यभर होतीये चर्चा । MLA Sunil Shelke
– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ, एका क्लिकवर पाहा यादी