Dainik Maval News : लोणावळा शहरात अवजड वाहनांना वाहतूकीस बंदी आहे. असे असतानाही नियमांचे उल्लंघन करुन शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी होत असते. यामुळे लोणावळा शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने नुकतीच विशेष दंडात्मक कारवाईची मोहीम राबवली.
या मोहिमेत दिवसभरात 205 अवजड वाहनांवर कारवाई करत दोन लाख आठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार अनिल शिंदे व सचिन कडाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
- लोणावळा पोलिसांच्या विशेष मोहिमेमुळे वाहतूक नियमनासाठी सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे. मात्र, भविष्यात या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत.
लोणावळा शहरामधून जाणाऱ्या महामार्गावर सातत्याने होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जड व अवजड वाहनांच्या प्रवेशावर 2022 साली बंदी घालण्यात आली होती. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत या वाहनांना शहरातून प्रवास करण्यास मज्जाव आहे. तथापि, टोल वाचवण्यासाठी अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात.
लोणावळा शहराच्या प्रवेशद्वारावर “जड व अवजड वाहनांना प्रवेश बंदी” असे फलक लावण्यात आले आहेत. तसेच, महामार्गावर वळण मार्ग उपलब्ध करून दिला आहे. परंतु या ठिकाणी पोलीस पथक कायमस्वरूपी तैनात नसल्याने वाहनचालक बंदी आदेशाचे उल्लंघन करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ई-हक्क प्रणाली : वारस नोंद, 7/12 वरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे यासाठी आता घरबसल्या जमा करा कागदपत्रे
– नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई ; थेट खात्यात जमा होणार रक्कम
– HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड

