Dainik Maval News : गुलियन बैरे सिंड्रोमची (जीबीएस) लागण झालेल्या पिंपळे गुरव येथील 36 वर्षीय व्यक्तीचा संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात मृत्यू झाला. या व्यक्तीला जीबी सिंड्रोमची लागण झाली होती. त्यांची नर्व कंडक्शन चाचणी 22 जानेवारीला सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली होती.
पिंपळे गुरव येथील 36 वर्षीय व्यक्ती खासगी कंपनीचे वाहन चालवत होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास व गिळता येत नसल्याने 21 जानेवारीला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल केले. दाखल करतेवेळी या रुग्णाला न्यूमोनिया असल्याने श्वास घेण्यास त्रास होत होता. जीबीएसची लक्षणे दिसत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी जीबीएसचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारी नर्व कंडक्शन तपासणी करण्याचा निर्णय घेतला. ही चाचणी 22 जानेवारीला करण्यात आली. त्याचा तपासणी अहवाल सकारात्मक आल्याने या रुग्णाला जीबी सिंड्रोमची लागण झाली असल्याचे निदान झाले.
- दरम्यान, उपचार सुरू असताना या रुग्णाचा गुरुवारी (दि. 30) रात्री मृत्यू झाला. या रुग्णालाय जीबी सिंड्रोमची लागण झाली असली तर न्यूमोनियामुळे श्वसन संस्थेवर आघात झाल्याने या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा दावा वैद्यकीय विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये 13 रुग्णांना जीबी सिंड्रोमची लागण झाली आहे. त्यापैकी 5 रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पालिकेने सुरू केली हेल्पलाइन –
गुलेन बॅरी सिंड्रोमया आजाराची योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी व नागरिकांच्या शंकांचे निरसन व्हावे, याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. ही हेल्पलाइन 24 तास उपलब्ध असेल. या हेल्पलाइन क्रमांकावर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी 24 तास उपलब्ध असतील. नागरिक आजाराबद्दल चौकशीकरिता 7758933017 या दूरध्वनी क्रमांकावर फोन करू शकतात, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City