Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील महामार्गांवरील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तळेगाव, चाकण आणि शिक्रापूर या औद्योगिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणांमध्ये रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल उभारणी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याचे ठरवण्यात आले आहे.
हे काम केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने करण्यात येणार असून, राज्य सरकार त्यासाठी निधी मिळवण्यासाठी विशेष पाठपुरावा करणार आहे. पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-अहमदनगर महामार्ग आणि इतर प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मल्टिलेव्हल उड्डाणपूल, नवीन सर्व्हिस रोड आणि सिग्नल फ्री ट्रॅफिक प्रणाली लागू करण्याची योजना आखण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मावळ तालुक्यातील वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, जलसंपत्ती व्यवस्थापन आणि धार्मिक पर्यटनस्थळांचा विकास यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सदर बैठकीला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मावळचे आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विशेषतः औद्योगिकरणामुळे वाहतूक कोंडी वाढलेल्या भागांत दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आधुनिक ट्रॅफिक व्यवस्थापन तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहतूक पोलिसांची संख्या वाढवली जाणार आहे.
लोणावळा आणि कार्ला येथील वाढत्या पर्यटकसंख्येमुळे या भागांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नवीन पोलीस ठाणी स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या पोलीस ठाण्यांमुळे पर्यटकांची सुरक्षा वाढेल आणि पर्यटनस्थळी होणारे गुन्हेगारी प्रकार आटोक्यात येतील.
वाहतुकीत होईल सुधारणा
राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पुणे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यास मदत होणार असून, औद्योगिक आणि पर्यटनवृद्धीस चालना मिळेल. महामार्ग सुधारणा आणि उड्डाणपूल बांधणीच्या माध्यमातून प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळेल.
एकवीरा देवी मंदिर परिसरात विकासकामे
श्री एकवीरा देवी मंदिर परिसरातील विकासकामांनाही गती देण्यात येणार आहे. दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने मंदिर परिसरात स्वच्छतागृहे, वाहनतळ, निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वेहेरगाव येथे प्रस्तावित फनिक्युलर रोप-वे प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 40 कोटीची पाणीपुरवठा योजना, 7.5 कोटीचे शॉपिंग सेंटर, संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे – वाचा वडगाव नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
– लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील 5 पानटपऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; विद्यार्थ्यांना पानामधून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा संशय
– अजित पवारांच्या मावळातील पदाधिकाऱ्याचे कृत्य ; जन्मदात्रीला केली मारहाण, आईने माध्यमांसमोर येत केले पितळ उघडे