Dainik Maval News : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष सांगता बीज सोहळा रविवारी (दि.१६) तीर्थक्षेत्र देहू येथे संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने भाविक, वारकऱ्यांच्या सोयीसुविधा वआणि सुरक्षितेच्या पार्श्वभूमीवर करावयाचे नियोजन बाबत हवेली उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक मुख्य मंदिर कार्यालयामध्ये नुकतीच आयोजित केली होती.
बीजोत्सव सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक, वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्येक विभागाने भाविकांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षितता संदर्भातील सर्व कामे पूर्ण करावी. केलेल्या कामांचा आराखडा बुधवारी (दि.५) होणाऱ्या बैठकीत सादर करावा व उभारण्यात येणाऱ्या नियंत्रण कक्षामध्ये प्रत्येक विभागाचा एक कर्मचारी असावा, अशा सूचना प्रांताधिकारी यशवंत माने यांनी दिल्या.
- बैठकीला संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, तहसीलदार जयराज देशमुख, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, अभियंता संघपाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर थोरात, उपसरपंच उर्मिला गायकवाड, ग्रामसेविका पूनम शेवाळे, मंडलाधिकारी दिनेश नरवडे, तलाठी सूर्यकांत काळे यांसह विविध विभागातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
बीज सोहळ्याच्या अनुषंगाने श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने शुक्रवारपासून (दि.७) गाथा पारायण सप्ताह सुरू होत आहे. या सप्ताहामध्ये सुमारे ५० हजार भाविक असणार आहे. या सप्ताहाची सांगता शुक्रवारी (दि.१४) होणार आहे. तसेच गाथा मंदिर मुख्य मंदिरातील भजनी मंडप आणि भंडारा डोंगर येथे ही सप्ताह होणार आहेत. तसेच रविवारी (दि.१६) बीज सोहळा संपन्न होत आहे. त्यामुळे आठवड्याभरापासून देहूत हजारोंच्या संख्येने भाविक वारकरी असणार आहे.
प्रत्यक्ष बीज सोहळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांचे आगमन होईल. यावेळी भाविकांना कोणतीही अडचण होणार नाही यासाठी स्वच्छता, साफसफाई, घंटागाड्या, शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, हायमास्क, पथदिवे, अखंडित विद्युत पुरवठा याचे नियोजन करणे. अनुचित प्रकार घडू नये, शहरात अवघड वाहनास बंदी करणे, आवश्यक मार्गावरील वाहतुकीत बदल करणे, पोलीस बंदोबस्त तैनात ठेवणे, सीसीटीव्ही कॅमेरा तसेच ड्रोन वापरणे, आदी सूचना देण्यात आल्या.
येलवाडी फाटा, विठ्ठलवाडी काळोखे चौक, परंडवाल चौक अशा देहूत प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर बॅरेकेट उभारण्यात येणार आहे. बीज सोहळ्यापूर्वी मध्यरात्रीपासून दुचाकीसह सर्वच वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. स्थानिक नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक