Dainik Maval News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2025-26 च्या अर्थसंकल्पात तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीच्या चारपदरी उन्नत मार्गासाठी 6 हजार 499 कोटी रुपयांची तरतूद केल्याने गेली 25 वर्षे लालफितीत अडकून पडलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांना लागली आहे.
वडगाव-तळेगाव-चाकण ते शिक्रापूर या महामार्गावरील प्रचंड अवजड वाहतूक, नागमोडी वळणे, कमी रुंदी आणि अपघातप्रवण ठिकाणे, यामुळे हा महामार्ग धोकादायक ठरत आहे. या रस्त्याचे गेली अनेक वर्षे लालफितीत अडकलेले काम सुरू होण्याची नागरिकांना अपेक्षा होती.
या मार्गावर पादचारी, दुचाकीस्वार चिरडले जाणे, गॅसटँकर धोकादायक वळणांवर उलटणे, सिग्नल चौकात वाहने एकमेकांवर आदळणे, रस्तादुभाजक नसल्याने वाहनांची समोरासमोर धडक होणे, असे प्रकार सातत्याने होत आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याची नागरिकांची भावना झाली होती. आता या रस्त्याचे काम तत्काळ सुरू होण्याची नागरिकांना अपेक्षा आहे.
- मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता जमीन अधिग्रहण आणि निविदा प्रक्रियेला वेग येणार आहे. तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चारपदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. तळेगाव, चाकण ते शिक्रापूर हा एकूण 53 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (मुंबई-पुणे महामार्गाला) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 पुणे-संभाजीनगर महामार्गाशी जोडणार आहे.
यामुळे पुण्याजवळील वाहतूक कोंडी कमी होईल. या प्रकल्पामध्ये सध्याच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरी उन्नत महामार्गात रूपांतर करणे आणि तळेगाव ते चाकणदरम्यान महत्त्वाच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधणे समाविष्ट आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 6,499 कोटी खर्च अपेक्षित असून, तो टोलवसुली किंवा कर्जाद्वारे उभारला जाणार आहे. एमएसआयडीसी या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे.
- तळेगाव-चाकण ते शिक्रापूर रस्त्याचे काम मागील अनेक वर्षे लालफितीत अडकून पडले आहे. तळेगाव, चाकण, रांजणगाव आदी एमआयडीसी याच रस्त्यावर असल्यामुळे या रस्त्याने नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असते. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे.
अवजड वाहतुकीचे कंटेनर, ट्रेलर आणि गॅसची वाहतूक करणारे एलपीजी टँकर धोक्याचा बावटा दाखवत धावत आहेत. मात्र, मागील 20 ते 25 वर्षांपासून येथील तळेगाव ते शिक्रापूर यादरम्यानच्या महामार्गाचे काम घोषणांच्या पुढे सरकलेले नाही.
उर्से, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, रांजणगाव एमआयडीसी आणि मराठवाडा, विदर्भ व मावळ, मुंबईकडे जाण्यासाठीचा जवळचा मार्ग म्हणून तळेगाव-चाकण-शिक्रापूर या 56 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर वाहनांची संख्या मागील काही वर्षांत वाढली आहे.
मावळ तालुक्यातील माळवाडी, इंदोरी बायपास, भंडारा डोंगर, सुधा पूल ते खेड तालुक्यातील महाळुंगे, खालुंब्रे, शेलपिंपळगाव, साबळेवाडी, बहुळ आदी ठिकाणी अरुंद रस्ते, तीव्र उतार व धोकादायक वळणे असून, अपघातप्रवण क्षेत्रे आहेत. तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता कधी केंद्र, तर कधी राज्य शासन करणार असल्याच्या घोषणा झाल्या. काम निविदास्तरावर असल्याचे मागील काही वर्षांत अनेकदा सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष जागेवर अजून काडीही हललेली नाही.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News