Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेने आतापर्यंत पाणीपट्टी व मालमत्ता करापोटी १८ कोटी ६७ लाख ३७ हजार रुपये वसूल केले असून कर न भरलेल्या २२ मिळकतदारांच्या मिळकतींना टाळे ठोकले आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्यावतीने थकीत मालमत्ता कराची वसुली मोहीम हाती घेतली असून यावर्षी शंभर टक्के वसुली करण्याचा निर्धार प्रशासन व्यक्त करत आहे. शहरातील मालमत्ताधारकांना याबाबतच्या नोटिसा नोव्हेंबर महिन्यातच पाठविण्यात आल्या आहेत.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड व कर संकलन विभागाच्या प्रमुख अधिकारी कल्याणी लाडे यांचे मार्गदर्शनाखाली ही वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
- तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या हद्दीत एकूण ३७ हजार मालमत्ता धारक असून त्यांच्याकडून मालमत्ता करापोटी ३३ कोटी ९० लाख २८ हजार ६०५ रुपये वसूल करावयाचे आहेत. त्यापैकी नॅशनल हेवी कंपनीच्या थकबाकीपोटी १२ कोटी रक्कम गुंतलेली आहे. मात्र, हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे २१ कोटी ९० लाख रुपये इतक्या मालमत्ता कराचे वसुलीचे उद्दिष्ट नगर परिषदेने निश्चित केले आहे. पाणीपट्टी म्हणून ९ कोटी ६६ लाख ६६ हजार रुपये वसूल करायचे आहेत. या वसुलीसाठी नगर परिषदेने विशेष नियोजन केलेले असून शहराचे यासाठी १२ विभाग करण्यात आलेले आहेत. त्यासाठी १२ वसुली अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत पाणीपट्टी कराचे ४ कोटी ६२ लाख २८ हजार रुपये वसूल झाले असून आतापर्यंतची वसुली ४७.८२ टक्के आहे. मालमत्ता करापोटी १४ कोटी ०५ लाख ८ हजार रुपये वसूल झाले असून वसुलीची टक्केवारी ६३.९८ इतकी आहे. या वसुली मोहिमेचा दररोज आढावा घेण्याचे काम मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे व पाणी पट्टी विभाग प्रमुख मोनिका झरेकर करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून यूपीएससीच्या धर्तीवर होणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘मावळात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होतोय, स्थानिक तरूणांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी’
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना 2028 पर्यंत मुदतवाढ – पाणीपुरवठा मंत्री

