Dainik Maval News : प्रतिनिधी – संध्या नांगरे : मोठेपणी आपल्या आईला आधार देणं हे प्रत्येक पाल्याचं आद्य कर्तव्य असतं. या कर्तव्याचा काही मुलांना विसर पडल्याचं चित्रही आपण पाहतो. परंतु, याऊलट खेळण्या-बागडण्याच्या वयात दोन भावंडं वडिलांपासून दुरावलेल्या आपल्या एकट्या आईचा खंबीर आधार बनली आहेत. मातृभक्ती व मातृप्रेमाचं हे हृदयस्पर्शी उदाहरण आहे… बहिण-भाऊ संतोषी-दत्ता आणि त्यांची आई वनिता यांचं. प्रतिकूल परिस्थितीत लेकरांना मोठं करताना लेकरांचीच मिळालेली साथ हेच या मातेला लेकरांनी केलेलं वंदन आहे.
वनिता शेंडगे (वय ४८) गेली पंधरा वर्ष पिंपरी परिसरात स्थायिक आहेत. संतोषी (वय १४) आणि दत्ता (वय १३) ही त्यांची मुलं महापालिकेच्या शाळेत आठवी इयत्तेत शिकताहेत. त्या मूळच्या उस्मानाबादमधील उमरगा तालुक्यातल्या. विवाहानंतर सुखी संसाराची स्वप्न घेऊन उदरनिर्वाहासाठी त्या पतीसह पिंपरी-चिंचवड परिसरात आल्या. पण अल्पावधीतच कौटुंबिक कारणांमुळे त्या पतीपासून दुरवल्या गेल्या आणि इवल्याशा कोवळ्या लेकरांना घेऊन शहरात एकटं राहण्याचं, त्यांना मोठं करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर उभं ठाकलं आणि त्यांनी पेलून दाखवलं.
लहानपणी हालअपेष्टा सोसल्या होत्याच पण आता लेकरं पदरात पडल्यावरही कष्टप्रद जीवन वाट्याला आलेलं पाहून ही आई गलबलून गेली होती, परंतु पोटच्या सोन्यासारख्या लेकरांसाठी या खडतर-रुक्ष वाटेवरुन कष्टत ती पुढं पुढं जात राहिली आणि लेकरांना सावली देत राहिली. लोकांची वाईट बोलणी तिनं सहन केली.
- एकटीच्या या प्रवासात सुरवातीला वनिताताईंनी होटेलमध्ये काम केलं. होटेलचं काम सांभाळून स्वयंपाकाचंही काम केलं. तेव्हा मुलं चार-पाच वर्षाची होती. मुलांना घरी ठेऊन त्या दिवसभर कामावर जायच्या. आईचा हा दुरावा ती बारकुली लेकरं फार रडारड न करता केवीलवाणी होऊन सहन करायची. मुलगी तर आईचं अनुकरण करत आई करते ती कामं करण्याचा प्रयत्न करायची. भावाकडंही लक्ष द्यायची. पुढं, ताईंनी मुलांना बालवाडीत घातलं तेव्हा तिथल्या बाईंनीही त्यांना मदत केली. नंतर बहिणीच्या मदतीनं त्यांनी मुलांना महापालिकेच्या शाळेत घातलं आणि लेकरांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं.
हॉटेलच्या कामानंतर ताईंनी केअर टेकर, सराफी दुकानात मदतनीस, शाळेमध्ये मदतनीस अशा प्रकारची कामं केली. आपल्या आईची ही कसरत पाहत मुलं मोठी होत होती आणि एकट्या आईचे आपल्यासाठीचे कष्ट पाहून ही भावंडं आईला जमेल ती मदत करायची. परिस्थितीची जाणीव झाल्यानं त्यांनी आईकडं हट्टही फारसा केला नाही. मिळेल त्यात खुश राहीली.
- सन २०२० मध्ये वनिताई पुन्हा गावी गेल्या. सासरी कोणाचही कोणतही सहकार्य न मिळल्यानं त्या माहेरी गेल्या. तिथं या आईनं आपल्या मुलांच्या मदतीनं दोन वर्ष शेती व पशुपालनाचा व्यवसाय केला. स्वबळावर छोटसं घर घेतलं. दत्ता आईसोबत कामाला जायचा आणि संतोषी घरची सर्व कामं करायची. या अवघड परिस्थितीत मुलांनी जराही तक्रारीचा सूर न काढता आईला सर्वतोपरी साथ देत दिली.
दोन वर्षानंतर मुलांच्या शाळेसाठी त्या पुन्हा शहरात परतल्या. एका शाळेत कामाला लागल्या. तुटपुंज्या पगारात घर चालवताना त्यांनी मोठी कसरत करत लेकराचं पोट भरलं. नंतर, मुलाला चांगलं वळण लागावं म्हणून विनंती करुन एका भाजीच्या दुकानात कामाला लावलं आणि तिथं गेली दोन वर्ष आठवतीला दत्ता अर्थार्जन करुन आईला हातभार लावतोय. सकाळी शाळेत जाऊन येऊन दुपारनंतर रात्रीपर्यंत दत्ता हसतमुखानं या दुकानात काम करताना दिसतो.
दुकानाची स्वच्छता करणे, भाज्या नीट लावणे, ग्राहकांना दर सांगणे, वजन करुन ग्राहकांना भाजी ही सर्व कामं तो जबाबदारीनं पार पाडतो. ग्राहकांशी छान संवाद साधतो. कामात आता तो रमून गेलाय आणि तरबेजही झालाय. बरेचदा तहानभूकेचही त्याला भान नसतं. दुकानातलीच एखादी काकडी-गाजर तो काम करता करताच खात असतो.
- अलीकडेच आईला तिची नोकरी सोडावी लागलीये पण दत्ता “आई, काळजी करु नकोस, मी आहे ना, मी काम करतोय ना.. ” असं म्हणत नित्यनियमानं कामावर येतोय. नुकतचं या मायलेकरानं हिमतीनं स्वतःचा भाजी व फळविक्रीचा छोटासा व्यवसाय सुरु केलायं. त्यासाठी ही मायलेकरं खूप मेहनत घेत आहेत. दुकानातलं काम सांभाळून दत्ता आपला व्यवसायही उत्साहानं करु लागलाय. सकाळी साखरझोपेतून उठून आईसोबत माल आणायला जावं लागतं पण दत्ता कधीच तक्रार करत नाही. दिवसभरही तो खूप श्रम करतो. कामामुळं शाळेत गैरहजर राहावं लागतं. पण आईला आपली मदत होतेय याचं मोठं समाधान कायमच त्याच्या चेहरयावर पाहायला मिळतं.
- लहान वयात काम करण्याची वेळ आल्यानं त्याची खेळण्या-बागडण्याची इच्छा अपूर्ण राहतेय त्यामुळं काम झाल्यावरही आनंदानं सायकल खेळताना दिसतो. दत्ताची बहिण संतोषी अभ्यास करुन घरची सर्व जबाबदारी सांभाळतेय. आत्ताच ती उत्तम स्वयंपाक करते. तिची चित्रकला-हस्तकला अतिशय सुंदर आहे. कष्ट पेलताना या गुणी मुलांचं शिक्षण थांबू नये अशी तळमळ वाटत राहते.
या छोट्याशा भावंडांशी बोलताना… त्यांचं आईसाठीचं प्रेम, आईची काळजी आणि आईच्या कष्टांची जाणीव सतत दिसून येते. हे निरागस हसरे चेहरे खूप काही सांगून-शिकवून जातात. आईलाही फक्त माझी मुलं मला साथ देताहेत याचं मोठं समाधान-अभिमान आहे. आता त्याचं आयुष्य सुखाचं व्हावं ही एकच इच्छा घेऊन ही आई पुढं-पुढं चाललीये. चिमुरड्या दत्ता आणि संतोषीनं आपल्या एकट्या आईच्या हातांना लावलेला हातभार निश:ब्द करायला लावणारा आहे. मायलेकरांच्या प्रेमाची, मातृभक्तीची ही खरी गोष्ट समोर पाहताना नकळत डोळे पाणावतात. मातृदिनानिमित्त लेकरांना घडवणाऱ्या वनिताताईंसारख्या सर्व मातांना दैनिक मावळकडून वंदन.
मायलेकरं म्हणतात…
वनिताताई म्हणतात, “माझी स्वप्न तर हरवून गेली. आता रात्रंदिवस मुलांचा विचार आहे. त्यांना शिकवून स्वतःच्या पायावर ऊभं करायचं आहे. पुढं त्यांच्या विवाहाची जबाबदारी पार पाडायची आहे. स्वाभिमानानं कष्ट करुन त्यांनी सुखी राहावं आणि चार लोकांत माझं नाव मोठं करावं.”
दत्ता म्हणतो, “मला मोठं होऊन स्वतःचं घर बांधायचयं. माझी जबाबदारी पूर्ण करायचीये.”
संतोषी म्हणते, “आमची आई एकटी आमच्यासाठी झटतेय. बाबा दुरावले आहेत पण आईनं आम्हाला त्यांची उणीव कधीच भासू दिली नाही. मला आईचा अभिमान वाटतो.”
अधिक वाचा –
– मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News
– मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News
– लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश
– मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link