Dainik Maval News : लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने कल्पना चावला स्पेस अकादमीची स्थापना करण्यात आली असून या अकादमीमध्ये देशभरातील १६ विद्यार्थी हे शालेय शिक्षणाबरोबरच अंतराळ विज्ञानाची मूलभूत तत्व शिकणार आहे.
- संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ भारतभूषण जोशी यांच्या हस्ते कल्पना चावला स्पेस अकादमीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. माधव भोंडे, उपाध्यक्ष नारायण भार्गव, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य सचिव राधिका भोंडे, इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ प्रा जगदीशचंद्र मठ, खगोल अभ्यासक डॉ. लीना बोकील आदी उपस्थित होते.
विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट’ लोणावळा यांच्या वतीने राष्ट्रउभारणी तमेच राष्टनिर्मितीच्या ध्यासानं ‘कल्पना चावला स्पेस अॅकॅडमी’ या संस्थेची स्थापना करण्यात आली असून संपूर्ण भारतातून एक प्रवेश परीक्षा घेण्यात येऊन १६ विद्यार्थ्यांना अॅकेडमीत प्रवेश देण्यात आला आहे. या अकॅडमीमध्ये इयत्ता सहावीमधून सातवीत जाणाऱया कुठल्याही भाषा, प्रांतमधील विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात येणार आहे.
- इयत्ता ७ वी ते १२ वी असा सहा वर्षांचा अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठीचा अभ्यासक्रम हा नामांकित संस्था इस्रोने अधिकृत मान्य केला असून इस्रो संस्थेने तसा करार देखील केला आहे. सहा वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना १८ विषय शिकवण्यात येणार असून यात इस्त्रोच्या अनेक संस्थांना भेट देण्यात येणार आहेत. मुलांना या अकादमीत अंतराळ विज्ञानाची मूलभूत तत्व शिकवली जाणार आहेत.
सोमवारी झालेल्या कार्यक्रमात संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ भारतभूषण जोशी म्हणाले की, यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतशील दृष्टी प्रयत्नांनी विकसित करावी लागते. प्रत्येकाने कल्पना चावला यांच्यासारखे अंतराळवीर व्हावे असे नाही तर अभियंता, शास्त्रज्ञ, कलाकार अशा कोणत्याही भूमिकेतून मानवतेच्या प्रगतीसाठी योगदान दिले जाऊ शकते. विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी देखील आजपर्यंत माणसाला विश्वाच्या एकूण पसाऱ्यापैकी केवळ पाच टक्के माहिती उपलब्ध आहे. आत्ता पुढील काळात ही माहिती गोळा करण्याचं काम हे युवा शास्त्रज्ञ करणार आहेत.
अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण देणारी कल्पना चावला स्पेस अकादमी ही भारतातील, किंबहुना जगातील एकमेव संस्था असून या संस्थेत पहिल्या वर्षात १६ विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. अंतराळ विज्ञानात भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश असून तो लवकरच प्रथम क्रमांकावर विराजमान होणार आहे. अंतराळ वैज्ञानिक घडविण्याच्या उद्देशाने कल्पना चावला स्पेस अकादमीची स्थापना करण्यात आली असून अत्यंत काटेकोरपणे या अकादमीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड करताना प्राधान्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. या संस्थेसाठी इस्रो, नेहरू स्पेस सेंटर अशा विविध संस्थांशी सहकार्य करार करण्यात आला असून, त्याचं देखील मार्गदर्शन या मुलांना मिळणार आहे, अशी माहिती संस्थेच्या सचिव राधिका भोंडे यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– किल्ले लोहगडाकडे जाणारा रस्ता अरूंद आणि धोकादायक ! तातडीने रुंदीकरण, डागडुजी करण्याची मागणी । Lohgad Fort
– मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली
– शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर