Dainik Maval News : देहूरोड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या हत्येच्या घटनेने देहूरोड शहरासह संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे. देहूरोड येथील थॉमस कॉलनी जवळील जंगल परिसरात गुरुवारी (दि. १२) पहाटे एका सोळा वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला आणि हत्येचे हे प्रकरण समोर आले. प्रेमसंबंधातील कारणातून हा खून झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
दिलीप मौर्या (वय १६) या मुलाचा खून झाला असून त्याचा चुलत भाऊ अरुण मौर्या (वय १४) हा हल्ल्यात जखमी झाला आहे. याप्रकरणी सनी सिंग (सध्या रा. देहूरोड, मुळ रा. गंभीरपूर, ता. शिवना, जि. गोपालगंज, रा. बिहार) याच्या विरोधात देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दिलीप मौर्या याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याच मुलीसोबत सनी सिंग याचीही जवळीक होती. यातून तीन महिन्यांपूर्वी दिलीप आणि सनी यांच्यात वाद देखील झाला होता. बुधवारी (दि. ११ जून) रात्री दिलीप मौर्याने चुलत भाऊ अरुण मौर्याला फोन करून थॉमस कॉलनीजवळील जंगल परिसरात बोलावले. तिथे दिलीप आणि सनी यांच्यात वाद सुरू होता. त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी अरुणमध्ये पडला असता सनीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.
जखमी अवस्थेत अरुण थॉमस कॉलनीकडे पळाला. त्याने इतर मित्रांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर अरुणला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, घटनास्थळी कोणीही सापडले नाही. रात्रभर शोध घेतल्यानंतर पहाटे सव्वा पाचच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गालगत सर्व्हिस रोडच्या खालील जंगल भागात दिलीप मौर्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यावर चाकूचे गंभीर वार असल्याचे निदर्शनास आले.
प्रेमप्रकरणातून सूड घेण्यासाठी सनी सिंगने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी सनी सिंगविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतात माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश । ahmedabad plane crash
– मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली
– शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर