Dainik Maval News : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची केलेली प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाला डावलून अतिशय चुकीच्या पद्धतीने व मनमानी पद्धतीने करण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी केला आहे. या प्रभाग रचनेवर पक्षाच्या वतीने हरकत दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा गणांची प्रारूप प्रभाग रचना सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केली. या प्रभाग रचनेबाबत पडवळ यांनी निवेदन प्रसिद्धीला दिले. त्यात म्हटले आहे की, आत्तापर्यंतच्या अशी विचित्र रचना करण्यात झाली नव्हती. कशाचाही ताळमेळ नाही.
संपूर्ण निवेदन –
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची केलेली रचना ही निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाला डावलून अतिशय चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात कधीही अशी रचना झाली नव्हती, अशी विचित्र रचना करण्यात आली आहे.
मावळ तालुक्याचा पश्चिम पट्टा, शहरी पट्टा आणि पूर्व पट्टा याचा कशाचाही ताळमेळ यामध्ये दिसत नाही. निवडणूक आयोगाने गट आणि गणाची रचना आटोपशीर करावी अशी लेखी कळविले असताना, मावळात रचना करण्यात आलेला वडेश्वर पंचायत समिती गण तब्बल 40 किलोमीटर लांबीचा आहे. तर टाकवे जिल्हा परिषद गट 40 ते 50 किलोमीटर लांबीचा केला आहे. या गटाचे एक टोक मुंबई पुणे हायवे शहराजवळ,दुसरे मंगरूळ एमआयडीसी जवळ तर तिसरे एकदम सावळा मावळात आहे.
हे नकाशा बारकाईने बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल, ही गट आणि गणाची रचना फक्त निवडणुकीपुरतीच नसते तर याचे विकासाच्या प्रक्रियेवर दूरगामी परिणाम होणारे असतात. या गटाप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या योजनेच्या अंमलबजावणीची यंत्रणा उभी केली जाते. प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि हुकूमशाही यातून पाहायला मिळते. याबद्दल आवाज उठवला नाही तर एक दिवस मावळ तालुक्याचे मोठे नुकसान होणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी