Dainik Maval News : गेल्या कित्येक महिन्यांपासून लोणावळा शहरातील मूलभूत प्रश्न प्रलंबित असून नागरिक त्रस्त आहेत. मात्र तरीही नगरपरिषद प्रशासनाचे काम संथ, निष्क्रिय व निष्काळजीपणाचे असल्याची तीव्र शब्दात खरमरीत टीका आमदार सुनील शेळके यांनी केली. आमदार शेळके यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 4 ऑगस्ट ) लोणावळा नगरपरिषदेच्या दालनात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत विविध विषयांवर खोलवर चर्चा झाली, यावेळी ते बोलत होते.
“भूसंपादनाचे नाव घेऊन उड्डाणपूलाचे काम थांबलेले का?”
भांगरवाडी उड्डाणपुलाचे काम सुरुवात होऊनही भूसंपादनाच्या प्रक्रियेत गोंधळ सुरूच आहे. हे काम पूर्ण व्हावे यासाठी प्रशासन गंभीरपणे काम करायला हवे, अशी आक्रमक भूमिका शेळके यांनी घेतली.
“सीसीटीव्हीचा DPRच नाही – मग सुरक्षितता कुठे?”
संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवण्याची योजना अजूनही कागदावरच असून DPR तयार करण्यासाठी अद्याप हालचाल नाही. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.
“शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्य अडवणारे ‘राजकारण’ अत्यंत निंदनीय!”
खंडाळा येथील विद्यार्थ्यांसाठी नवीन शाळेच्या जागेबाबत बैठकांमध्ये सहमती मिळूनही स्थानिक काही व्यक्ती राजकारणासाठी भूसंपादनात अडथळा निर्माण करत असल्याचे आमदार शेळके यांनी स्पष्टपणे सांगितले. “विद्यार्थ्यांचे नुकसान होणे ही क्षम्य बाब नाही. हा प्रकार समाजविघातक आहे,” असा ठपका त्यांनी ठेवला.
“नगरपरिषद प्रशासन ढिसाळ; आता जिल्हाधिकाऱ्यांना थेट जाब विचारणार!”
लोणावळा नगरपरिषदेचा संपूर्ण कारभार ढिसाळ, निष्क्रिय व लोकहितशून्य असल्याचा आरोप करत आमदार शेळके यांनी घोषणा केली की, “दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर किंवा मोकळ्या मैदानात सभा घेऊन शहरातील कामांचा लेखाजोखा विचारला जाईल.”
“अवैध धंदे, अंमली पदार्थ वाढले – पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी”
शहरात चोऱ्या, गुटखा, ड्रग्ज आणि अवैध धंद्यांची वाढ चिंतेची बाब असून पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी व कारवाईत तत्परता दाखवावी, अशा शब्दांत त्यांनी सूचनाही दिल्या.
“वाहतूक कोंडीवर उपाययोजना – ५० ट्रॅफिक वॉर्डनची लवकरच नेमणूक”
शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ४० नवीन व १० जुन्या ट्रॅफिक वॉर्डन्सची नियुक्ती लवकरच होणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.
सदर बैठकीला उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसिलदार विक्रम देशमुख, पोलीस निरीक्षक राहुल लाड, नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्यासह विविध पक्षांचे स्थानिक नेते, नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकांच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड होणार नाही. प्रशासन योग्य काम करत नसेल, तर त्यांना जागं करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा आम्ही दिलाच आहे. – आमदार सुनील शेळके
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या