Dainik Maval News : डोंगर, दऱ्या, टेकड्यांचा प्रदेश असल्याने मावळ तालुका हा पर्यटनाचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. डोंगरदऱ्यांच्या कुशीतील हे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक मावळात येतात. तसेच ह्याच डोंगर दऱ्यांत उगविणारे नैसर्गिक खाद्य अर्थात डोंगर, माळरानावरील विविध रानभाज्या ह्या देखील मावळची खास ओळख आहे. कुठल्याही लागवड प्रक्रियेशिवाय उगविणाऱ्या या रानभाज्या अतिशय पौष्ठीक आणि आरोग्यदायी असल्याने त्यांना सध्या बाजारात सध्या मोठी मागणी आहे.
मावळच्या डोंगरभागात, माळरानावर विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात. आजही गावखेड्यातील नागरिक या भाज्या आवडीने खातात. विशेषतः श्रावण मासात जेव्हा मांसाहार वर्ज्य केला जातो, तेव्हा या रानभाज्या आवडीने खाल्ल्या जातात. डोंगर, माळरानावर उगविणाऱ्या, परंतु ओळखण्यास काहीशा कठीण असणाऱ्या या वेली, पाने, कंदांची एकदा की माहिती झाली, की मग हा निसर्ग खजिना आपल्याला तृप्ती अन् आनंद देऊन जातो.
मान्सून पाऊस सुरू झाल्यानंतर व काहीएक दिवस पावसाची जोरदार बरसात झाल्यानंतर डोंगरभागांत, माळावर विविध प्रकारची पाने, वेली, कंद यांची उगवण होते. यात काही खास प्रकारची पाने, वेली आणि कंद यांचा आहारात समावेश करता येतो. वाघाटी, कुळू, चायत, चाईचा मोहोर, बेंद्रा, भारंगी, अळंबी, करटोली, अळूची पाने, रुखवळ, घोटवेल, चिचार्डी अशा काही वेगवेगळ्या रानभाज्या आहेत. ह्या रानभाज्या ओळखता येणे तसे सोप्पे, परंतु एखाद्या जाणकार व्यक्तीकडून त्याची खाण्यापूर्वी माहिती करून घेणे गरजेचे आहे. काहीवेळा रानातील विषारी भाज्या आणि खाण्याच्या रानभाज्या यांची ओळख करण्यात गल्लत होते, त्यामुळे एकदा यांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.
पूर्वी जेव्हा व्यवसाय म्हणून शेती सर्वाधिक होत असे आणि घरोघरी गुराखी असे तेव्हा डोंरात नित्याने जाणाऱ्या व्यक्तींमुळे प्रत्येक घरांत रानभाज्या आहारात असायच्या. परंतु हल्ली घरोघरी गोठे कमी झाले अन् रानात जाणाऱ्यांची संख्या कमी झाली, त्यामुळे गावखेड्यातही आहात सहज समाविष्ठ होणाऱ्या ह्या भाज्यांची संख्या कमी झाली. पूर्वी आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या आणि आहारात नेहमीच समावेश असणारा हा अमूल्य निसर्गखजिना आजकाल ताटातून कमी होत असल्याचे दिसते. परंतु, दुसरीकडे आदिवासी बांधव मात्र हा निसर्गखजिना डोंगर दऱ्यांतून शोधून तो बाजारात आणीत आहेत, यातून त्यांचे चांगले अर्थाजन देखील होत असून कुटुंबाचा खर्च भागविला जातो.
आरोग्यदायी आणि आयुर्वेदिक महत्व –
मावळच्या ग्रामीण भागातील खाद्य संस्कृतीचा राजभाज्या हा अविभाज्य घटक होता. आयुर्वेदीक अशा ह्या भाज्या सेवन केल्याने आरोग्य देखील चांगले राहायचे, परंतु आता ह्या भाज्या दुर्मिळ झाल्या. किंवा त्या खाण्यात कमी झाल्या. त्यामुळे आरोग्यावरही फरक पडताना दिसतोय. आजकालच्या तरूणाईला या भाज्या माहिती नाहीत, परंतु आम्ही लोकं आजही या भाज्या आजही आवडीने खातो, असे शिळींब येथील भगवान दरेकर, विष्णू बिडकर यांनी सांगितले.
श्रावणात रानभाज्यांचे सर्वाधिक सेवन –
श्रावण मासात जेव्हा मांसाहार वर्ज्य केला जातो, आणि व्रतवैकल्य अधिक केली जातात. तेव्हा ह्या रानभाज्या सर्वाधिक खाल्ल्या जातात. ग्रामीण भागात तर काही सण समारंभात विशेष प्रकारच्या रानभाज्या असाव्यात अशी पद्धत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर
