Dainik Maval News : गणेशोत्सवाच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, चालीरिती असल्याचे दिसून येतात. यात गौरी गणपती विसर्जनानंतर लेकी मागण्याची परंपरा मावळातील ग्रामीण भागात आजही आहे. मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये लेकी मागण्याचा पारंपारिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
पवन मावळ विभागातील अनेक गावांत लेकी मागण्याचा पारंपारिक खेळ उत्साहात संपन्न झाला. जवळपास सर्वच गावांमध्ये लेकी मागण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गावातील लहान मुलींपासून ते वृध्द महिलांपर्यंत सर्वजण आनंदाने यात सहभागी होत असतात. गौरीसाठी माहेरी आलेल्या माहेरवाशीन महिलांचा यात उत्साहाने सहभागी होत असतात.
महिला संसारातील सुख-दुःख विसरून सहभागी होतात :
गावांतील गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लेकी मागण्याचा कार्यक्रम संपन्न होत असतो. येळसे गावातील यंदाही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. गावातील प्रत्येक घरातील महिला यात सहभागी झाल्या होत्या. एकत्र आल्यानंतर महिलांनी फुगड्या खेळणे, फेर धरणे, पारंपारिक गाणी गाणे, उखाणे घेणे अशा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. याशिवाय उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची अशा स्पर्धांनी कार्यक्रमात रंगत आणली.
मुलगी मागणे आणि लग्न सोहळा :
लेकी मागण्याच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे, एखाद्या लहान मुलीला मुलाच्या वेशात सजविले जाते. त्या मुलाकडील मंडळी मुलीच्या घरी मुलगी मागण्यासाठी जातात. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मात्र विनोदी शैलीत हा कार्यक्रम होतो. पसंतीनंतर लग्नाची तयारी ढोल ताशांच्या गजरात नवरा नवरीची वरात काढली जाते. यामध्ये महिला मनसोक्त नाचतात, गातात. साधारण तास दीड तास ही वरात चालते. त्यानंतर मोठ्या दिमाखात लग्न सोहळा होतो. जमलेल्या सर्व मंडळींना भोजन दिले जाते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई ; पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश
– जी.एस.टी. कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मिळणार चालना ; पाहा कर कपातीमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे
– महसूल विभाग १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा’ राबविणार