Dainik Maval News : तळेगाव आणि चाकण या औद्योगिक क्षेत्रांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या प्रलंबित कामाची निविदा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अखेर प्रसिद्ध केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील टप्पा क्रमांक १ आणि २ मार्गे ही क्षेत्रे जोडली जातात. यातील सुमारे दीड किलोमीटर रस्त्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसे झाल्यास नवलाख उंबरे परिसरातील वाहतूक कोंडीतून वाहनचालक, उद्योजकांची सुटका होण्याची अपेक्षा आहे. ग्रामस्थांनी तळेगाव एमआयडीसी बंद ठेवण्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्याने प्रशासनाला जाग आली.
तळेगाव एमआयडीसी परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी ४० कोटी ९० लाख ७६ हजार ७२६ रुपयांच्या निधीअंतर्गत निविदा प्रक्रिया सुरू झाली. एमआयडीसीच्या पुणे प्रकल्प विभागाने तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक १ व २ यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कामासाठी ३१ कोटी २० लाख ३५ हजार ८८८ रुपये आणि तर टप्पा १ मधील अशुद्ध पाणी ऊर्ध्व जलवाहिनीलगतचा सेवा रस्ता (मंगरूळ रस्ता) आणि जॅकवेल रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ९ कोटी ७० लाख ४० हजार ८३८ रुपये रकमेची निविदा प्रसिद्ध केली.
निविदा प्रक्रिया ४ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान पूर्ण केली जाणार असल्याने या रस्त्यांची कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही रस्त्यांची कामे अखेर मार्गी लागल्याने तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कामगार तसेच परिसरातील नागरिकांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण होणार आहे.
उद्योजक रामदास काकडे यांनी शेतकरी आणि प्रशासनात समेट घडवून आणत प्रलंबित जोडरस्त्यासाठी लागणाऱ्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या पूर्वेकडील भूसंपादनाचा तिढा सोडविला. मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. मावळ पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे, माजी उपसभापती शांताराम कदम, उद्योजक संजय साने यांच्यासह स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई ; पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश
– जी.एस.टी. कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मिळणार चालना ; पाहा कर कपातीमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे
– महसूल विभाग १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा’ राबविणार