Dainik Maval News : “स्वतःसाठी जगा तर थोडे जगा, पण समाजासाठी जगा तर अमरत्व मिळते” या विचारांना जणू प्रत्यक्ष कृतीत उतरविणारे व्यक्तिमत्व म्हणजे कामशेत (ता. मावळ) येथील हभप संतोष दगडू कुंभार. कुंभार समाजोन्नती मंडळ, पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आणि संत शिरोमणी गोरोबा काका पायी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे नेतृत्व केले, ते केवळ समाजापुरतेच मर्यादित नसून संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी मार्गदर्शक ठरले आहे.
त्यांच्या याच कार्याची दखल घेत, अविष्कार फाऊंडेशन, कोल्हापूर या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत एनजीओ संस्थेने वर्ष २०२५ चा राज्यस्तरीय “आविष्कार समाजरत्न गौरव पुरस्कार” संतोषशेठ कुंभार यांना जाहीर केला होता. रविवार, दि. १४ सप्टेंबर रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी भगवान कुंभार, सखाराम कुंभार, रामचंद्र हाडशीकर,संतोष गा. कुंभार, प्रभाकर छत्तीसकर,दत्तात्रय कोथुर्णेकर, गोपीचंद महाराज कचरे, असवले महाराज, मकरंद कुंभार, आण्णा काळे महाराज, माजी सभापती सुवर्णा कुंभार, कोमल कुंभार, पूनम कुंभार इत्यादी समाज-बांधव उपस्थित होते. ह भ प संतोष कुंभार यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दानशूरतेचा वारसा :
दानशूरपणा हा त्यांच्या रक्तातच आहे. स्वतःच्या सुखासाठी न जगता समाजाच्या उन्नतीसाठी सतत धडपडणे, ही त्यांची जीवनशैली आहे. अन्नदान, वस्त्रदान, शैक्षणिक मदत, उपचारासाठी मदत अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी असंख्य कुटुंबांना आधार दिला आहे. फक्त कुंभार समाजापुरतेच नव्हे तर इतर समाजातील गरजूंसाठीही त्यांचा सढळ हात नेहमीच पुढे सरसावतो.
शैक्षणिक क्षेत्रातील योगदान :
शिक्षण हा समाजोन्नतीचा पाया आहे, हे जाणून त्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. गरीब विद्यार्थ्यांच्या फी, पुस्तके व इतर साहित्याची सोय करून त्यांचे शिक्षण अखंडित राहावे याची काळजी घेतली. युवकांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना शिक्षणासोबतच सामाजिक जाणिवा दिल्या.
सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्य :
वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. भजन, कीर्तन, नामस्मरण यामध्ये ते स्वतः सक्रियपणे सहभागी होतात. संत शिरोमणी गोरोबा काका पायी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी वारकऱ्यांना एकत्र आणले आणि भक्तीचा महासागर निर्माण केला.
सामाजिक व राजकीय योगदान :
संतोषशेठ यांनी समाजातील अनेक चळवळींमध्ये पुढाकार घेतला आहे. वधू-वर मेळावे आयोजित करून विवाहासाठी अडचणीत असलेल्या कुटुंबांना मदत केली. आंदोलने व समाजाचे प्रश्न मांडणे यामध्ये ते नेहमी अग्रभागी असतात. युवकांसाठी क्रिकेट मॅचेस व क्रीडा स्पर्धा भरवून त्यांच्या अंगभूत प्रतिभेला वाव दिला.
यशाची पावती – समाजरत्न गौरव पुरस्कार :
इतक्या विविध क्षेत्रात केलेले कार्य हेच त्यांच्या यशाची खरी पावती आहे. त्यामुळेच त्यांना राज्यस्तरीय “आविष्कार समाजरत्न गौरव पुरस्कार” मिळणे ही प्रत्येक कुंभार समाजबांधवासाठी अभिमानाची बाब आहे.
समाजासाठी प्रेरणा :
ह.भ.प. श्री. संतोषशेठ दगडू कुंभार हे केवळ एक व्यक्ती नाहीत, तर समाजासाठीचा जिवंत संदेश आहेत. “समाजासाठी जगा, तर समाज तुम्हाला देवदूत ठरवेल” हा संदेश त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे उमटतो.
लेखन : श्री ऋषिकेश रेवणनाथ काशिद ( अध्यक्ष : कुंभार समाजोन्नती मंडळ, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena