Dainik Maval News : पवना मावळातील सांगवडे, साळुंब्रे, दाळुंब्रे, धामणे, गोडुंब्रे व नेरे या गावांमध्ये पीएमआरडीएने रिंगरोड आणि टीपी (टाऊन प्लॅनिंग) योजनेसाठी शेतजमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयाला स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला असून, हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहेत.
“भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर !”
पीएमआरडीएच्या प्रस्तावित योजनेनुसार, संबंधित गावांतील सुमारे ५० टक्के जमीन शेतकऱ्यांकडून घेतली जाणार आहे. उर्वरित ५० टक्के जमीन शेतकऱ्यांकडे राहील, असा दावा प्रशासनाने केला असला तरी शेतकरी या आश्वासनांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
“या भागातील साखर कारखाना हा आमच्या श्रमावर उभा राहिलाय. जर जमीनच राहिली नाही, तर ना शेती टिकेल ना कारखाना,” अशी प्रतिक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी दिली.
“गरज नाही तरी रिंगरोड?”
सध्या सांगवडे नदीवर नवीन पूल उभारला जात आहे, ज्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना काहीसा फायदा होणार आहे. मात्र अशा वेळी टीपी योजना व रिंगरोडची गरजच काय? असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत.
“गरज नसताना केवळ बिल्डर लॉबीला फायदा व्हावा म्हणूनच या योजना रेटून लावल्या जात आहेत,” असा आरोप शेतकरी करत आहेत.
“हा निर्णय बिल्डरधार्जिणा”
शेतकऱ्यांचा ठाम आरोप आहे की, रिंगरोड व टीपी योजनांच्या आडून बिल्डरांच्या हितसंबंधांना खतपाणी घालण्याचा डाव पीएमआरडीएने रचला आहे.
“आमच्या जमिनी बळकावून बिल्डरांच्या घशात घालण्याचे हे षड्यंत्र आहे. याला आम्ही कडाडून विरोध करू. आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. गरज पडल्यास छातीवर गोळ्या झेलण्यासही मागेपुढे पाहणार नाही,” असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
स्थानिक नेत्यांचा पाठींबा
या आंदोलनाला स्थानिक नेत्यांचा देखील सक्रिय पाठिंबा आहे. मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तसेच खासदार श्रीरंग बारणे हे या लढ्याला नैतिक व राजकीय पाठिंबा देत आहेत.
“शेतकऱ्यांच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याकडे लक्ष दिले आहे,” अशी माहिती या नेत्यांनी दिली.
“पर्याय फक्त एकच – रस्ता वळवावा!”
शेतकऱ्यांनी पर्यायही सुचवला आहे – ६५ मीटर रुंद रिंगरोडऐवजी मुळशी तालुक्यातून येणारा ४५ मीटर रुंद रस्ता हिंजवडी, मारूंजी, नेरे, कासरसाई व चांदखेड मार्गे पीएमआरडीसीच्या ११० मीटरच्या महामार्गाशी जोडावा.
“हा पर्याय स्वीकारण्यात आला तरच आम्ही शांत राहू. अन्यथा आंदोलन अटळ आहे,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेवटचा इशारा : माघार नाही!
“शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू. ही केवळ जमीन नव्हे, आमचा जीव आहे!” — अशा ठाम शब्दांत शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News
