Dainik Maval News : दिवाळी सणाचे दिवस संपल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडण्याची चिन्हे दिसत आहेत. यात सर्वांत आधी नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका होतील, त्यानंतर थोड्या दिवसांच्या फरकाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका होतील, असा अंदाज आहे. दरम्यान या चारही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्याने मावळ तालुक्यात इच्छुक उमेदवार कामा लागल्याचे दिसत आहे. मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे.
मावळ तालुक्यात लोणावळा नगर परिषद, तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि वडगाव नगरपंचायत यांच्या निवडणुका होणार आहेत. तर, मावळ पंचायत समितीचे दहा गण आणि पुणे जिल्हा परिषदेचे पाच गटांत निवडणुक होणार आहे. या सर्वच ठिकाणच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्या आहेत. यामुळे आता सर्व ठिकाणी इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत.
यंदा दिवाळीत इच्छुक उमेदवारांनी थेट मतदारांच्या दारात जाणे पसंत केले. उटणे, मिठाई, फटाके यांचे वाटप करुन मतदारांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. तर, काहींनी थेट आदिवासी पाड्यावर, वाडीवस्तीवर जाऊन समाजात आपल्याप्रती आदर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दिवाळी अद्याप संपली नसून पुढील दोन तीन दिवस सणाचा आनंद राहणार आहे, याकाळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार कसरत करत आहेत.
दरम्यान मावळ तालुक्यात महायुती होणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे, तसेच महाविकासआघाडीच्या गोटातही कुठलीही हालचाल होताना दिसत नाहीये. यामुळे इच्छुक उमेदवार काळजीत पडले आहेत. परंतु आपले पारडे हलके राहता कामा नये यासाठी तयारी मात्र सर्वबाजूने करत असल्याचे दिसत आहे. कदाचित दिवाळीचे सणाचे दिवस संपल्यानंतर मावळातील राजकारणात स्पष्टता येईल, असा अंदाज आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगावचे नवीन पोलीस निरिक्षक अभिजित देशमुख यांची धडाकेबाज कामगिरी ; डोणे गावातील अवैध दारूभट्टी केली उध्वस्त
– मुरलीधर मोहोळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर… काय आहे किस्सा ? वाचा सविस्तर । Murlidhar Mohol
– भरधाव वॅगनर कारच्या धडकेत गंभीर जखमी होऊन 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; शिरगाव पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल




