Dainik Maval News : सोमवारी (दि. 20 ऑक्टोबर) रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा ‘न भूतो न भविष्यती’ असा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला. हा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विशेष कष्ट घेतले होते, याचे कारण या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते.
परंतु ऐन कार्यक्रमाच्या दिवशी अजित पवार अनुपस्थित राहिले आणि आमदार सुनील शेळके यांच्यासह सर्वांचाच हिरमोड झाला. दरम्यान अजित पवार यांच्या कार्यक्रमाला न येण्याचे कारण व्यासपीठावरील मंत्रीगण व स्वतः आमदार सुनील शेळके यांनीही सांगितले. परंतु याबद्दल आता राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगत आहे.
सोमवारी कार्यक्रमाला अजितदादा येणार यामुळे सर्वजण उत्साही होते. संपूर्ण तळेगाव शहरात होर्डिंग, सजावट यामुळे वेगळे रुप आले होते. नवीन प्रशासकीय इमारत देखील सजविण्यात आली होती. तर जवळपास वीस हजार नागरिक उपस्थित होते. भव्य मंडप टाकण्यात आला होता. सोबत राज्यासह केंद्रातील मंत्रीगण आमंत्रित आणि उपस्थित होते. फक्त प्रतीक्षा होती, ती अजित पवार यांच्या येण्याची आणि इमारतीचे लोकार्पण करण्याची.
दरम्यान ऐनदिवशी ऐनवेळी अजित पवार हे कार्यक्रमाला येणार नसल्याचे समोर आले. अजित पवार कार्यक्रमास न येण्याचे कारण स्वतः आमदार सुनील शेळके आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात सांगितले. स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यास गेलेले अजित पवार हे परतीच्या प्रवासानंतर आजारी पडले, व तब्येत खालावल्यामुळे त्यांनी सोमवारचे सगळेच कार्यक्रम रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु याबद्दल आता एक वेगळी नवीन चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या इमारतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव असल्यामुळे अजित पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे टाळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा जपल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर स्थापन झालेल्या भाजपा-शिवसेना सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाले. परंतु पक्षाच्या विचारधारेशी कोणतीही तडजोड न करता विकासाच्या मुद्द्यावर ते महायुती सरकारमध्ये सामील झाल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. महायुतीमध्ये अजित पवार भाजपसोबत आहेत, भाजप नेत्यासोबत ते सरकारच्या शासकीय कार्यक्रमात उपस्थित राहतात. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही व्यासपीठावर अजित पवार कधीच दिसत नाहीत, किंबहुना संघाशी संबंधीत कार्यक्रमाला देखील हजेरी लावत नाहीत, हे मागील अडीच वर्षात अनेकदा दिसून आले आहे.
भाजपा-शिवसेना हे हिंदुत्वाच्या विचारधारेशी बांधील असल्याने राष्ट्रवादीची धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपण्यासाठी व बिगर हिंदूत्ववादी मते राखण्यासाठी अजित पवार जाणिवपूर्वक प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगावचे नवीन पोलीस निरिक्षक अभिजित देशमुख यांची धडाकेबाज कामगिरी ; डोणे गावातील अवैध दारूभट्टी केली उध्वस्त
– मुरलीधर मोहोळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर… काय आहे किस्सा ? वाचा सविस्तर । Murlidhar Mohol
– भरधाव वॅगनर कारच्या धडकेत गंभीर जखमी होऊन 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; शिरगाव पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल



