Dainik Maval News : राज्य सरकारच्या कृषी विभागाने साथी पोर्टल-२ चा वापर सक्तीचा केल्याने राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनच्या (माफदा) आवाहनानुसार मंगळवारी (दि. २८) पुणे जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रे एक दिवस बंद ठेवण्यात आली. मावळ तालुक्यातही या बंदला विक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मावळ तालुका फर्टिलायझर डीलर असोसिएशन चे अध्यक्ष नितीन जगताप यांनी याबाबत बोलताना सांगितले की, साथी पोर्टल २ च्या अंमलबजावणी विरोधात विक्रेत्यांनी अनेक तक्रारी केल्या, त्या तक्रारींवर शासनाकडून कोणतीही सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संघटनेने राज्यव्यापी बंदचा निर्णय घेतला, या निर्णयास मावळमधील विक्रेत्यांनी मान्यता दिल्यानंतर हा संप पाळण्यात आला.
साथी पोर्टल-२ च्या सक्तीमुळे विक्रेत्यावर अनावश्यक ताण पडत आहे. प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना विक्रेत्यांनी याबाबत निवेदन दिले आहे. शासनाकडून वरिष्ठ पातळीवर बैठक घेण्याचे नियोजन सुरू आहे. या मुद्द्यावर लवकर तोडगा काढण्याची आमची मागणी आहे, असे मावळ तालुका फर्टिलायझर डीलर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन जगताप यांनी सांगितले.
साथी पोर्टल २ :
राज्याच्या कृषी विभागामार्फत बियाणे खरेदी व विक्रीसाठी साथी पोर्टल-२ ही व्यवस्था हंगाम २०25 पासून अमलात आणली. या पोर्टलबाबत विक्रेत्यांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या तक्रारींचा विचार करून कृषी विभागाने या संदर्भात अंमलबजावणी स्थगित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही साथी पोर्टल-२ चा वापर सक्तीने सुरू आहे. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
– राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती, मावळातील भातउत्पादक शेतकरी चिंतेत
– दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर
