Dainik Maval News : मावळ तालुक्यात दोन दिवसांपूर्वी पाच पक्षांची महाविकासआघाडी उदयास आली होती. महाविकासआघाडीचे पहिले तीन प्रमुख घटक पक्ष काँग्रेस (आय), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या जोडीला मावळ तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडी हे तीन पक्ष सामील झाले होते. या तीन्ही पक्षांच्या तालुकाध्यक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत मविआ ची घोषणा करीत आगामी निवडणूका लढविण्याचे जाहीर केले होते. परंतु स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी आघाडीत बिघाडी झाली आहे.
वंचित बहुजन आघाडी चे मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पुसाणे ( ता. मावळ ) येथील नितीन ओव्हाळ हे वंचितचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करीत होते. त्यांच्या कार्यकाळात पक्षाने तालुक्यात चांगली उभारी घेतली होती. परंतु महाविकासआघाडी सोबत जाण्याचा त्यांचा निर्णय वरिष्ठांना मान्य नसल्याचे समोर आले आहे. याकारणाने त्यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.
पक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक तथा वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय महासचिव प्रियदर्शी तेलंग यांनी याबाबतचे पत्र जाहीर केले आहे. बुधवारी हे पत्र समोर आले. त्यानुसार, पुणे जिल्हा कार्यकारिणीने दिलेल्या अहवालानुसार निर्णय घेऊन नितीन ओव्हाळ यांना तालुकाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले असून वंचित बहुजन आघाडी पक्षातून सहा महिने करिता निलंबित करण्यात येत आहे, असे म्हटले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
– राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती, मावळातील भातउत्पादक शेतकरी चिंतेत
– दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर
