Dainik Maval News : मावळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांचा समावेश असलेल्या संयुक्त पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख व तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी दिली.
मावळ तालुक्यामध्ये अद्याप पाऊस पडत असल्याने शेतीचे, घरांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संयुक्त पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके स्वतःहून तालुक्यातील १८८ गावांमध्ये झालेल्या बांधकामाच्या पडझडीचे, शेतीच्या नुकसानीचे तसेच जीवितहानीचे पंचनामे करतील व नुकसानीची अंदाजित रक्कम नमूद करून परिपूर्ण पंचनामे अहवाल सादर करतील.
पूर्ण वर्षभरासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी व महसूल विभागाचे मंडळ अधिकारी हे सनियंत्रण व पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.
सर्व संबंधित पर्यवेक्षकीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील गावातील पंचानाम्यापैकी २५ टक्के पंचनाम्याची रँडम पद्धतीने तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करतील, अशी माहिती तहसीलदार देशमुख व तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी दिली.
सदर कामामध्ये कोणतीही दिरंगाई अथवा कसूर होणार नाही याची पथकातील कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्याविरुद्ध केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील प्रकरण १० मधील नियम ५६ अन्वये योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी

