Dainik Maval News : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपआपसातील वाद समझोत्याने मिळविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात येणार आहे. अधिकाधिक पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन व सचिव सोनल पाटील यांनी केले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३२० नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, धनादेश न वटण्याची (चेक बाउन्स) प्रकरणे, जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबित असणारी प्रकरणे तसेच बँक, वीज कंपनीची दाखल पूर्व प्रकरणे आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत येणारी प्रकरणे तडजोडी करीता ठेवण्यात आलेली आहेत.
आपली प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीकरीता ठेवण्याकरिता नागरिकांनी संबंधीत न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. लोक न्यायालयामध्ये प्रकरणे ठेवण्याकरिता पक्षकार त्यांच्या वकिलांचीदेखील मदत देखील घेऊ शकतात.
लोक न्यायालयामध्ये प्रकरण मिटल्यास न्यायालयीन शुल्क नियमाप्रमाणे परत मिळू शकते. प्रकरणाचा झटपट निकाल लागतो. लोक न्यायालयाच्या निकालावर अपील करता येत नाही. परस्पर संमतीने निकाल झाल्याने आपआपसात कटूता कमी होण्यास मदत होऊन वेळ व पैसा दोघांचीही बचत होते, अशी माहिती श्रीमती पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण


