Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता मंगळवार (दि. २) रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा तेलभाते आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
निवडणूक निरीक्षक सुनील माळी यांच्या निरीक्षणाखाली ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मतदानासाठी ईव्हीएम (इलेक्टॉनिक व्होटिंग मशिन)चा वापर करण्यात येणार आहे. त्यामध्ये कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटचा समावेश असणार आहे. शनिवारी मतदानाची पूर्व तयारी म्हणून मतदानासाठी आवश्यक पुरेशी मतदान यंत्रे तसेच राखीव मतदान यंत्रे तयार करून त्यांचे सीलिंग करण्यात आले. त्यापैकी दहा टक्के मतदान यंत्रावर एक हजार अभिरूप मतदान (मॉकपोल) करण्यात येऊन मतदान यंत्रे योग्य असल्याबाबत पडताळणी करण्यात आली.
यावेळी निवडणूक निरीक्षक सुनील माळी, निवडणूक अधिकारी मनिषा तेलभाते, सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रवीण निकम, सर्व मतदान क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक, नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी उपस्थित होते. सोमवारी मतदानासाठी नियुक्त पथकांना मतदान यंत्रे हाताळणी व इतर साहित्याबाबत प्रात्यक्षिक घेऊन सर्व साहित्य दुपारपर्यंत त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे व पोलिस बंदोबस्तासह त्यांची रवानगी संबंधित मतदान केंद्रांवर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशानुसार सोमवारी (दि.१) रात्री दहा वाजता निवडणूक प्रचार बंद होईल.
१७ प्रभागांसाठी २४ मतदान केंद्रे
नगरपंचायतीच्या १७ प्रभागांमध्ये २४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(केशवनगर), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (कातवी), रमेश कुमार सहानी इंग्लिश मिडीयम स्कूल, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणांचा समावेश आहे. रमेश कुमार सहानी येथे एक महिला मतदान केंद्र व केशवनगर शाळेत एक आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असणार आहे.
एकाच बॅलेट युनिटवर दोन मतपत्रिका
शहरात एकूण १९ हजार ८४७ मतदार असून, त्यात ९ हजार ६७९ महिला आणि १० हजार १६८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. एकाच बॅलेट युनिटवर नगराध्यक्षपदासाठी गुलाबी मतपत्रिका व संबंधित प्रभागातील नगरसेवक पदासाठी पांढरी मतपत्रिका असणार आहे. बॅलेट युनिटवरील यादीतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार या दोन्ही यादीतील प्रत्येकी एका उमेदवारासमोरील बटन दाबल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
मतमोजणी दिवशी दुकाने राहणार बंद राहणार
निवडणुकीची मतमोजणी बुधवारी (दि. ३) सकाळी दहा वाजता नगरपंचायत कार्यालयात होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मतदानाच्या दिवशी सकाळी साडेसात ते मतदान संपेपर्यंत सर्व मतदान केंद्रांच्या तसेच मतमोजणी ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत सर्व ठिकाणापासून १०० मीटर परिसरातील सर्व व्यावसायिक आस्थापना, सर्व मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, चिन्हांचे प्रदर्शन करण्यास निवडणूक प्रक्रियेशी संबंधित व्यक्ती व त्यांच्या वाहनांव्यतिरिक्त इतर व्यक्तीस अथवा खासगी वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
मतदानासाठी नगरपंचायत प्रशासन सज्ज असून, सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा तेलभाते व सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा निकाल

