Dainik Maval News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात एक मुले, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री असा अद्वितीय राजकीय प्रवास त्यांनी केला. लातूर जिल्ह्याचे सुपुत्र असलेले चाकूरकर एक सुसंस्कृत व चारित्र्यसंपन्न राजकारणी म्हणून परिचित होते. १९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील प्रभावी नेता म्हणून उदयास आले.
स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९९१ ते १९९६ या काळात ते देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष होते. २००४ मध्ये निवडणूक हरूनही त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी राजीनामा दिला होता.
२०१० ते २०१५ या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. सुमारे पाच दशकांचा संसदीय आणि प्रशासकीय अनुभव, विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले योगदान यामुळे शिवराज पाटील हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व मानले जात.
गेल्या काही वर्षापासून ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले होते. निष्कलंक जीवन आणि राजकारणातील त्यांची अभ्यासू व स्वच्छ प्रतिमा आज अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांचे निधन हे काँग्रेस पक्षाचे आणि देशाच्या राजकीय क्षेत्रात मोठे नुकसान आहे. सर्वच स्तरातून शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार
– लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा
– इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान
– नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात
