Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तब्बल आठ ते नऊ वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकांमध्ये नेत्यांसह नागरिकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अशात या निवडणुका शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडाव्या यासाठी शासकीय यंत्रणा देखील सज्ज झाल्या असून पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोडवर पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक काळात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता कामशेत पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून पोलीस निरिक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविली जात आहे. यानुसार कामशेत शहरात आणि कामशेत पोलीस ठाणे हद्दीत जागोजागी चेक पॉइंट बनवून तिथे प्रत्येक संशयीत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
काळ्या काचा असलेल्या वाहनांवर विशेष लक्ष –
सदर मोहीमेत काळ्या काचा असलेल्या, काळ्या फिल्म लावलेल्या आणि फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या चारचाकी वाहनांवर विशेष लक्ष देऊन त्यांची कसून तपासणी केली जात आहे. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनामार्फत ही विशेष काळजी घेतली जात आहे.
कामशेत शहर हे अतिसंवेदनशील क्रमवारीत येते. यामुळे पोलिस प्रशासनाने अवैध गतिविधीवर बारीक लक्ष ठेवल्याचे दिसून येत आहे. मावळात व कामशेत शहरात इतर मार्गाने अमली पदार्थांचे साठे येऊ नयेत, याकरिता विशेष मोहीम राबविली जात आहे.
कामशेत शहरामधून नाणे मावळ, पवनमावळ, आंदरमावळ, पुणे व मुंबई या ठिकाणांकडे जाण्यासाठी मार्ग असल्याने शहरात गाड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये, याकरिता प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. नागरिकांनी देखील आपल्या परिसरात जर काही संशयास्पद वाहने, हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– राष्ट्रवादीकडे युतीसाठी कुठलाही प्रस्ताव नाही अन् मावळात राष्ट्रवादीसोबत युती नाही ! – बाळा भेगडे यांच्याकडून युतीला फुलस्टॉप
– इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप ; प्रशांत भागवत, मेघा भागवत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम
