दैनिक मावळ, दि. १२ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्याच्या राजकारणात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नसून, त्या अनेक नेत्यांच्या राजकीय वाटचालीची पायरी ठरल्या आहेत. १९६१ च्या कायद्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची स्थापना झाली आणि १९६२ मध्ये पहिली निवडणूक झाली. नुकतीच पार पडलेली निवडणूक ही या दीर्घ प्रवासातील ११ वी सार्वत्रिक निवडणूक ठरली आणि या निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पाने उलटवली.
१९६२ ते १९७९ : काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व
मावळ तालुक्यात सुरुवातीला ३ जिल्हा परिषद गट आणि ६ पंचायत समिती गण—अशा एकूण ९ जागा होत्या. १९६२ आणि १९६७ या पहिल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सर्व ९ जागांवर पूर्ण बहुमत मिळवत सत्ता अबाधित राखली. त्या काळात काँग्रेसला कोणताही प्रभावी विरोध नव्हता.
१९७२ : जनसंघाचे पहिले खाते
१९७२ मध्ये मावळच्या राजकारणात पहिल्यांदा वेगळा रंग दिसला. तत्कालीन जनसंघाने प्रथमच खाते उघडले. तळेगावचे विठ्ठल उर्फ बबनराव खांडगे हे मंगरूळ गावात नाव नोंदवून, आंदर मावळ मतदारसंघातून बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य झाले. मात्र, मध्यंतरी त्यांचे पद गेले आणि झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे मारुतराव गाडे निवडून आले.
१९७९ : सत्ता टिकली, पण आव्हान वाढले
१९७९ च्या निवडणुकीतही काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. मात्र, ९ पैकी एकमेव जागा जनसंघाने जिंकली. नवलाख उंबरे गावचे बाजीराव शेटे हे पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झाले. पहिल्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेसने सत्ता राखली, पण विरोधाची बीजे रुजली होती.
सभापती-उपसभापतींचा विक्रमांचा काळ
मावळ पंचायत समितीच्या इतिहासात आतापर्यंत २४ सभापती आणि २१ उपसभापती झाले आहेत.
* रघुनाथ दादा सातकर – ११ वर्ष सभापती, ५ वर्ष उपसभापती
* आण्णासाहेब ढमाले – सलग १२ वर्ष उपसभापती
* रघुनाथ दादा सातकर व आण्णासाहेब ढमाले – सलग २३ वर्ष जिल्हा परिषद सदस्य
हे विक्रम आजही मावळच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतात.
सत्तांतरांची समसमान लढत
आतापर्यंत झालेल्या १० निवडणुकांमध्ये
* ५ वेळा काँग्रेस
* ५ वेळा भारतीय जनता पक्ष
यांनी बहुमत मिळवले. म्हणजेच मावळचा मतदार कायमच जागरूक राहिला, सत्ता बदलत ठेवत राहिला.
जिल्हा पातळीवर पदांची दुर्मीळ संधी
६३ वर्षांच्या इतिहासात मावळला फक्त तीन वेळा जिल्हा परिषदेत महत्त्वाची पदे मिळाली
* १९९७ – स्व. दिलीप टाटिया (बांधकाम समिती)
* २०१४ – आतिश परदेशी (समाज कल्याण समिती)
* २०२० – बाबुराव वायकर (कृषी व पशुसंवर्धन समिती)
११ वर्षांचा अभूतपूर्व कार्यकाळ
१९७९ चा जिल्हा परिषद कार्यकाळ तब्बल ११ वर्षे सलग चालला. त्या काळात कमिटी (बॉडी) बरखास्त झाली नाही. कारण तेव्हा राज्य निवडणूक आयोग अस्तित्वात नव्हता. १९९२ मध्ये राज्य निवडणूक आयोग स्थापन झाला. त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारच घेत होते; फक्त केंद्रीय निवडणूक आयोग अस्तित्वात होता.
जिल्हा परिषद ते विधानसभेपर्यंतचा प्रवास
मावळने अनेक आमदार घडवले
* १९६७ – उपसभापती असताना रघुनाथ दादा सातकर आमदार
* १९७९–१९८६– सभापती असतानाच मदन बाफना आमदार
* १९९५ – उपसभापती रूपलेखाताई ढोरे आमदार
रघुनाथ दादा सातकर, मदन बाफना, रूपलेखाताई ढोरे आणि दिगंबर दादा भेगडे —हे चार जिल्हा परिषद सदस्य पुढे आमदार झाले.
स्वीकृत सदस्यांची परंपरा
१९६२ ते १९९५ या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीत स्वीकृत सदस्य पदाची तरतूद होती. या माध्यमातून दिवंगत माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिवंगत केशवराव वाडेकर, शंकरराव शेलार, स्व. गंगाधर बवरे, भरत शिंदे आदींनी काम केले.
२०२६ : इतिहासाला नवे वळण
ज्या मावळने सुरुवातीला काँग्रेसला सर्व जागा दिल्या, त्याच मावळने २०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व जागांवर विजय देत ‘क्लीन स्वीप’ घडवून आणला. हा निकाल केवळ निवडणूक विजय नाही, तर मावळच्या ६३ वर्षांच्या राजकीय इतिहासातील नवा अध्याय ठरतो. मावळचे राजकारण बदलते आहे आणि पुढचा काळ काय सांगतो, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू
– मार्केटयार्ड (पुणे) ते शिळींब (ता. मावळ) पीएमपीएमएल बससेवेचा प्रारंभ ; स्थानिकांच्या मागणीला आणि आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश