दैनिक मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील आंदर मावळ विभागातील पारिठेवाडी ते अनसुटे मार्गावरील पुलावर पुराचे पाणी वाहिले होते. पुराचे पाणी ओसरल्यानंतर या पुलाची व रस्त्याची झालेली दुरवस्था समोर आली आहे.
- गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे पुलाच्या बाजूचा भराव वाहून गेला, त्यामुळे रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. परिणामी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावरून पुराचे पाणी वाहते आणि वाहतूक ठप्प होते. तसेच प्रवाशांना, वाहनचालकांना येथून जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
सदर पुलाच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे अनेकदा निवेदने दिली. तरीही येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्यया नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
- या मार्गाचा वापर पारिठेवाडी आणि अनसुटे परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार, व्यापारी तसेच ग्रामस्थ दररोज करतात. पुलाच्या धोकादायक स्थितीमुळे एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नवख्या पर्यटकांचा अपघात होण्याचीही शक्यता आहे.
येथे नवीन व मजबूत पुलाचे बांधकाम सुरू करावे, तोपर्यंत धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे, इशारा फलक आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करावी, प्रशासनाने त्वरित पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
