Dainik Maval News : पर्यटननगरी लोणावळा शहरातील रस्ते सध्या प्रशासनाने उचललेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे मोकळा श्वास घेऊ लागले आहे. परंतु तालुक्याचे ठिकाण असलेले वडगाव मावळ शहरातील रस्ते मात्र अद्याप अतिक्रमणाच्या भस्मासूराने वेढलेले आहे. यामुळे वडगावातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास नक्की कशाचा अडथळा आहे, याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. राजकीय दबाव, नेत्यांचे वरदहस्त की प्रशासनाची उदासीनता? नक्की अतिक्रमणविरोधी कारवाई का होत नाही, रस्ते खुले करण्यास प्रशासन का पुढे येत नाही, याबद्दल नागरिकांमध्ये संतप्त भावना आहे.
वडगाव शहरात एकमेव बाजारपेठ असून बाजारपेठ रस्त्यालगतच धार्मिक स्थळे आणि नगरपंचायत इमारत आहे. सोबत, वडगाव शहर हे तालुक्याचे महसूली केंद्र असल्याने येथे दिवसभर तालुक्याभरातून आलेल्या नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे मुख्य बाजारपेठ रस्त्यावर धावणारी वाहनांची संख्या अधिक असते. अशात बाजारपेठेतील अतिक्रमणांमुळे जागोजागी रस्ते अरुंद बनले असून दुकानांपुढे लावले जाणारे बोर्ड, दिवसभर उभी केली जाणारी वाहने, दुकानाबाहेर आलेले पत्रे, ओटे, शेड यामुळे रहदारीस अडथळा होत असतो, ज्याचा त्रास सामान्यांना तर होतोच, सोबत वाहतूक कोंडीही होते.
आश्चर्याची बाब म्हणजे हाकेच्या अंतरावर नगरपंचायत, हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन, हाकेच्या अंतरावर तहसील, पंचायत समिती, कोर्ट आदी प्रमुख सरकारी अस्थापना असताना मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधी पाऊल उचलण्यास कुठलेच प्रशासन पुढे येत नसल्याने याची नकारात्मक चर्चा नित्याने होत आहे.
वडगावचा बाजारपेठेचा भाग वगळल्यास उर्वरित भागातही परिस्थिती काही वेगळी नाही. कामशेतमार्गे वडगाव कमानीतून प्रवेश केल्यानंतर सरदार महादजी शिंदे पुतळा ते पंचायत समिती चौक हा परिसर आणि तळेगाव मार्गे वडगाव कमानीतून प्रवेश केल्यापासून ते मिलिंदनगरपर्यंतचा भाग या दोन्ही टप्प्यात रस्ता दिसायला जरी रुंद असला, तरी इथेही जवळपास सर्व रस्ता हा कायमस्वरूपी पार्किंग स्पॉट, बंद पडलेल्या वाहनांचा पार्किंग स्पॉट बनलेला दिसतो. तसेच काही व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेले दिसते. त्यामुळे येथेही रस्ता असुन तो वापरात येत नाही. स्मशानभूमी परिसरातील रस्ता तर वाहनांच्या कायमस्वरूपी पार्किंगमुळे खासगी जागा बनल्याचा भास होतो आहे.
सेवा रस्ते ५० टक्के गायब
वडगाव शहराला जोडून असणाऱ्या जुना पुणे-मुंबई हायवेला दुतर्फा सेवा रस्ता आहे. परंतु सद्यस्थितीत दोन्ही बाजूचे सेवा रस्ते हे ५० टक्के गायब झालेल्या अवस्थेत आहे. लगतच्या दुकानांचे अतिक्रमण, रस्त्यावरील पत्रा शेड, रस्त्यावर आलेली झाडे-झुडपे यामुळे सेवा रस्ते वापरणे हे देखील धोकादायक आणि कठीण बनले आहे. या मार्गावरून वर्षभर पालख्या, दिंड्या जात असतात, गावातील नागरिकांची वाहने ये-जा होत असतात, अशात सेवा रस्ते देखील खुले होणे गरजेचे आहे.
“वडगावचा अतिक्रमणाचा प्रश्न सोडविणे कठीण नाही. परंतु स्थानिक नेते आणि प्रशासन यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसते. स्थानिक नेते राजकारण, निवडणुका, मतांचे गणित यामुळे याकडे दुर्लक्ष करतात, तर प्रशासन- अधिकारी हे अर्थपूर्ण संबंधातून याकडे दुर्लक्ष करतात, असा गंभीर आरोप सातत्याने दबक्या आवाजात होत असतो. दरम्यान कारणे काहीही असो, मात्र वडगावातील रस्ते वाहतूक सुधरवण्यासाठी, रहदारी अधिक सुरक्षित करण्यासाठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यापलीकडे दुसरा शाश्वत मार्ग नाही, हेही सत्य आहे. यामुळे आता प्रशासन, लोकप्रतिनिधी कधी जागे होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.”
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू
– पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा
– राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
– ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’
