महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने मंगळवारी (दि. ३) मध्यरात्रीनंतर ७२ तासांचा संप पुकारला आहे. हा संप झाल्यास पुणे परिमंडल अंतर्गत आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याद्वारे पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे तालुके व हवेली तालुक्यांमध्ये सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर २४ तास सज्ज आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या संपाच्या पार्श्वभूमीवर पुणे परिमंडलामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून आपत्कालीन व्यवस्था उभारण्यास वेग आला आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल व संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनुसार पुणे परिमंडलस्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध उपाययोजनांसह विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर २४ तास सुरु राहणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. दर तासाला वीजपुरवठ्याच्या स्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयास कळविण्यात येणार आहे.
पर्यायी स्वरुपात मनुष्यबळ – राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीमधील २९ विविध संघटनांनी हा संप पुकारला आहे. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्यास सर्वोच्च प्राथमिकता देण्यासाठी महावितरणकडून पर्यायी स्वरुपात मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे. संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी, महावितरणचे अप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. तसेच शासनाच्या विविध विभागातील सेवानिवृत्त विद्युत अभियंता व तांत्रिक कर्मचारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक कार्यालयामधील विद्युत अभियंता व कर्मचारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व विद्यार्थी यांच्याशी संपर्क करण्यात आला असून त्यांचे सहकार्य मिळणार आहे. बाह्य स्त्रोत कंत्राटदारांना अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. या सर्वांना पोलीस संरक्षण तसेच वाहन व्यवस्था, जेवण व इतर सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हेही वाचा – सावधान! पाणी भरुन ठेवा.. मोबाईल चार्जिंग करा… राज्यातील वीज कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर
रोहीत्र, वीजवाहिन्यांसह इतर साधनसामुग्री उपलब्ध – संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्रत्येक विभागात निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच महावितरणकडून वितरण रोहीत्र, ऑईल, वीजतारा, केबल्स, वीजखांब, फिडर पिलर्स, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सेस, वाहतुकीसाठी वाहने आदी आवश्यक साधनसामुग्री महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
सर्व वरिष्ठ अधिकारी ‘ऑन फिल्ड’- पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत, श्री. सतीश राजदीप, डॉ. सुरेश वानखेडे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते हे संपकाळात ‘ऑन फिल्ड’ असणार आहेत. विभाग ते परिमंडलस्तरीय नियंत्रण कक्षाशी २४ तास संपर्क ठेऊन कोणत्याही कारणास्तव खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राथमिकता देण्यात येणार आहे. यासोबतच महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी व उपकेंद्रांशी समन्वय ठेवण्यात येत आहे.
शासनाच्या विविध विभागांचे सहकार्य- संपकाळात वीजग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण व राज्य शासनाचे विविध विभागांमध्ये समन्वय सुरु झाला आहे. महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महानगरपालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार (पुणे), श्री. शेखर सिंह (पिंपरी), पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार (पुणे), श्री. विनय कुमार चौबे (पिंपरी) यांना लेखी निवेदन देऊन संपाबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार संपाच्या आपत्कालीन परिस्थितीत महावितरण व शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत नियोजन करण्यात आले आहे. तसेच पोलीस विभागाला महावितरणचे कार्यालय व उपकेंद्रांची यादी देण्यात आली आहे. त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठीही दक्षता घेतली जात आहे. पोलीस संरक्षण दिले जात आहे. याकामी महावितरणचे सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी तसेच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
घरगुतीसह अत्यावश्यक क्षेत्रात सुरळीत वीजपुरवठ्याची खबरदारी – संपकाळात प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह पाणी पुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. या संपाची व्याप्ती मोठी असल्याने पर्यायी सेवा देणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे तसेच वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत.
अधिक वाचा –
– कर्तृत्ववान नेता काळाच्या पडद्याआड गेला; आमदार लक्ष्मण जगताप यांना खासदार श्रीरंग बारणेंकडून श्रद्धांजली अर्पण
– तीर्थक्षेत्र देहूत विकास कामांचा धडाका; खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन, लोकार्पण