मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सोमवारी (दिनांक 22 मे ) रात्री 11.15 च्या सुमारास मुंबई लेनवर किलोमीटर 36/800 जवळ भीषण अपघात झाला.
कंटेनर (क्र. RJ-19-GH-4497) चा पुणे ते मुंबई असा प्रवास करत असताना किलोमीटर 36 /800 या ठिकाणी आल्यावर ब्रेक फेल झाला. त्याने इको कार (क्र MH- 03- DA- 8233), क्रेटा कार (क्र. MH – 43- BN- 9114), टाटा जेस्ट कार (क्र. MH -14 – EU -352), हुंडाई कार (क्र. MH -47-K- 6112) किया कार (क्र.MH 03- EB-9777) आणि स्विफ्ट कार (क्र. MH 02- BM- 9022) या वाहनांना धडक दिली. ( Accident due to truck brake failure on Mumbai Pune Expressway 1 death Many injured )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कंटेनरची धडक एवढी जबरदस्त होती की धडक दिलेल्या वाहनातील प्रवाशांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. अपघात झाल्याचे समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पॉलिसी यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, आरटीओ, लोकमान्य ॲम्बुलन्स यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी पोचली.
सर्व जखमींना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले तेथे प्राथमिक उपचार करून जखमींना एमजीएम रुग्णालय पनवेल येथे शिफ्ट केले. त्या दरम्यान हात तुटल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊन रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर असून अन्य तीन प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.
सदर कंटेनर अपघाताच्या ठिकाणाहून पळून जात असताना बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेने पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पाठलाग करून कंटेनर अडवून चालकाला ताब्यात घेतले. अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्याने सहा. पो. नि. हरेश काळसेकर, पोलीस उप निरक्षक आलोक खीसमतराव यांनी आपल्या कर्मचारी वर्गासह पोहचून घटनेची चौकशी सुरू केली.
अपघात घडल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांनी तातडीने उपाययोजना अवलंबत बाधित वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी रात्री उशिरापर्यंत मदत कार्याचा आढावा घेतला. खोपोली नगरपालिका रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सतर्क करून योग्य उपचार देण्यासाठी खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी निर्देश दिले होते त्यामुळे प्राथमिक उपचार तातडीने होऊन जखमींना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात मदत झाली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीमने दाखवलेल्या सतर्कतेबद्दल तहसीलदार आयुब तांबोळी यांनी कौतुक केले आहे.
अधिक वाचा –
– सभापतीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? 24 मे रोजी बाजार समिती सभापती पदाची निवडणूक, ‘या’ नावांची सर्वाधिक चर्चा
– आंदर मावळमधील मुख्य रस्ता असलेल्या टाकवे ते वडेश्वर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ