Dainik Maval News : राज्य शासनाने ड्रग्ज रॅकेटविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून ड्रग्ज प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरोधात शासन कडक कारवाई करत आहे. युवकांच्या भविष्याच्या रक्षणासाठी सरकार कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
अंमली पदार्थ विरोधी कारवाईतील दोषींवर कारवाई करण्याबाबत विधानसभा सदस्य वरूण सरदेसाई यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई सुरू असून, संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. सरकारची भूमिका पूर्णपणे झिरो टॉलरन्सची आहे. ड्रग्ज रॅकेटमधील आरोपींवरच नव्हे तर त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई केली जात आहे. पोलिसांपैकी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित न करता थेट बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर ड्रग्ज विक्रीसाठी होत असल्याचे लक्षात आल्याने, त्यांच्यावरही नजर ठेवली जात आहे. केमिकल ड्रग्जची निर्मिती लहान ठिकाणीच होत असून, हे अतिशय घातक स्वरूपाचे आहेत. त्यामुळे ड्रग्ज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या परवान्यांवर आणि त्यांच्या वापरावर देखरेख ठेवली जात आहे. मुंबई पोलिसांनी एका प्रकरणात आरोपीला परदेशातून अटक केली आहे. राज्य आणि देशासाठी हे एक मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री योगेश कदम यांनी मागच्या एका वर्षात ड्रग्ज प्रकरणात १० पोलिसांना बडतर्फ केले असल्याची माहिती सभागृहात दिली. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अस्लम शेख, हेंमत ओगले यांनी सहभाग घेतला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– माझी वसुंधरा अभियान 5.0 : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा विभागस्तरीय प्रथम क्रमांक ; 75 लाख रुपयांचे पारितोषिक
– मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार यांच्याकडून पदाचा राजीनामा
– सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड
