Dainik Maval News : लोणावळा शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपुरुष समूह शिल्प परिसरामध्ये हातोडा मारत तोडफोड करणाऱ्या माथेफिरू विरोधात लोणावळा शहर सर्वपक्षीय दणका मोर्चा काढण्यात आला होता. मागील महिन्यात, दिनांक 14 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती.
सामाजिक सलोखा बिघडू नये याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे व सर्वपक्षीयांनी या घटनेनंतर लोणावळा शहर पोलीस व लोणावळा नगरपरिषद प्रशासन यांची भेट घेत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत व घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत संबंधित माथेफिरुला लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती.
लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने देखील राष्ट्रपुरुषांचे समूह शिल्प असलेल्या परिसरामध्ये सुरक्षारक्षक नियुक्त केले असून कॅमेरे देखील लावले आहे. दरम्यान, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा हा प्रकार आहे. शिल्प परिसरामध्ये जाऊन हातोड्याने परिसराची नुकसान करण्यापूर्वी संबंधित माथेफिरू हा चौकामध्ये उभा होता. विकृत मानसिकता असलेल्या या व्यक्तीने हा घाणेरडा प्रकार केला असल्यामुळे त्या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी लोणावळा शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.
दिवसभर पाऊस सुरू असताना देखील या पावसामध्ये सर्व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना सूर्यकांत वाघमारे म्हणाले, संबंधित घटनेमागे काही षडयंत्र आहे का, याचा पोलिसांनी सखोल तपास करावा. राष्ट्रपुरुषांच्या बाबतीमध्ये वारंवार विटंबना करण्याच्या घटना वेगवेगळ्या भागांमध्ये घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी असे प्रकार करणाऱ्यांविरोधात अतिशय कडक कारवाई करण्यात यावी व राष्ट्रपुरुषांचे पुतळे स्मारक ज्या ठिकाणी आहेत तेथे 24 तास सुरक्षारक्षक तैनात करावेत व सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली.
प्रभाग रचनेवर प्रश्नचिन्ह :
लोणावळा नगरपरिषदेने प्रभाग रचना करत असताना ज्या भागांमध्ये दलित वस्ती आहे, अशा काही भागांची नावेच प्रभाग रचनेतून कमी केली आहेत. लोणावळ्यातील सिद्धार्थ नगर ही दलित वस्तीची मावळ तालुक्यातील ओळख असताना प्रभाग रचना तयार करताना सिद्धार्थ नगर हे नावच कमी करण्यात आले आहे. तसेच रेल्वे विभाग वलवन विभाग या ठिकाणी देखील चुकीच्या पद्धतीने रचना करण्यात आली आहे, या घटनांचा देखील या दणका मोर्चामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. लोणावळा शहर व मावळ तालुक्यामधील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena