Dainik Maval News : मावळ तालुक्यातील लोणावळ्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या राजमाची दुर्ग जोडीच्या पायथ्याला उधेवाडी गावात असलेल्या तलावाशेजारी असलेल्या गोधनेश्वर मंदिराच्या मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या स्तंभावर कोरलेला शिलालेख आढळला आहे. सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून आठ ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेखाची शिळा अनेक वर्ष दुर्लक्षित असल्याने वातावरणामुळे सर्व अक्षरे झिजून पुसट झाली आहेत. शिलालेखाचा छाप घेतला असता त्यावरील अक्षरे खूपप्रयत्नाने वाचता येतात.
शिलालेखाचे वाचन :
१.श्री
२.सलाव अष
३.दास यस वा
४.श्रम समग्र गु
५.रवार नावा छ
६.तेणे राम समई
७.सवत १८०६ वै
८.शाख शुध १३
शिलालेखाचा अर्थ : कार्याची सुरवात श्री स्तुतीने करून देव भक्तीशी जोडलेले अष्टदास यानी पुर्ण कष्ट, परिश्रम व यत्न करून छ त्रपती रामराजे यांच्या कारकिर्दीत किंवा रामाच्या स्मरणाने, रामाला उद्देशून त्यावेळेस सवत १८०६ म्हणजे सन १९ एप्रिल १७४९-५० बुधवार- गुरवारच्या दिवशी दानधर्म व विधिवत पूजा अर्चा करून मंदिराचे बांधकाम पूर्ण केले .
शिलालेखाचे महत्व :
श्री” — शुभारंभी “श्री” चा प्रयोग आहे.
“सलाव अषदास यस वा” — इथे “सलाव” हा शब्द “सलाम”, “स्वस्ति”, “सलावद” (प्रशस्तीचा आरंभ) यापैकी आहे. “अष दास” म्हणजे कदाचित एखाद्या व्यक्तीचे नाव (उदा. अषदास/अष्टदास). “अष दास” हा एखाद्या स्थानिक दानकर्त्याचा किंवा अधिकारी व्यक्तीचा उल्लेख असावा.
“श्रम समग्र गुरु वार नावा छ” — याचा अर्थ “श्रम-समग्र गुरुवार” म्हणजे एखाद्या गुरुवारच्या (देवपूजेचा दिवस.) दिवशी हा शिलालेख लिहिला गेला. या नोंदीतून दिसते की त्या काळात गावातील व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नाने धार्मिक कामे करत असत. “श्रम समग्र” या शब्दावरून स्पष्ट होते की हे कार्य लोकांच्या परिश्रमाने पूर्ण झाले..”तेणे राम समई” — म्हणजे “त्या काळी रामाच्या (राम प्रहरी –पहाटे प्रभातकाळ, पवित्र मुहूर्त..) काळात / नावाने” असा संदर्भ असू शकतो.”सवत १८०६” — विक्रम संवत १८०६ (इ.स. १७४९-५० च्या सुमारास वैशाख शुद्ध त्रयोदशी (शुक्ल पक्षातील १३वा दिवस). दान, स्नान आणि पुण्यकर्मासाठी अत्यंत शुभ तिथी असते .त्यामुळे हा शिलालेख मराठेशाही (छ.रामराजे ) काळाशी संबंधित ठरतो.
“हा काळ मराठ्यांच्या प्रशासन, देवालयनिर्मिती, आणि दानव्यवस्थेचा उत्कर्षकाळ होता. हा शिलालेख इ.स. १७४९–५० च्या सुमारास रचलेला असून, तो स्थानिक समाजाच्या धार्मिक कार्यात सहभाग, दान, व श्रमसंघटनेचे दर्शन घडवितो. भाषा, दिनदर्शिका, आणि सामाजिक जीवनाच्या अभ्यासासाठी हा शिलालेख महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज आहे. हे या लेखाचे महत्व आहे.” – अनिल दुधाने, इतिहास अभ्यासक
माहिती – दक्ष काटकर
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा !