Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांची मनमानी समोर आली आहे. “आम्ही सांगू त्या दुकानातूनच शालेय वस्तू, गणवेश, खरेदी करा,” असा आग्रह तळेगाव दाभाडे शहरासह मावळातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा धरत आहेत. शाळांच्या या सक्तीने पालकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप जागरुक नागरिकांनी केला आहे.
याबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून शिक्षणमंत्री दादाजी भुसे, आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षणाधिकारी यांनाही कळविण्यात आले आहे.
पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी वह्या-पुस्तके, गणवेश शाळेतूनच किंवा आम्ही सांगू त्या दुकानातून घ्यावेत, अशी सक्ती काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा करीत आहेत. त्याद्वारे शाळा आणि विक्रेते नफेखोरी करत आहेत, असा गंभीर आरोप करण्यात आला असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचेही म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक अरुण माने, माहिती अधिकार कार्यकर्ता जयंतराव कदम यांनी याबाबत निवेदन दिले आहे. अवास्तव दरात शालेय साहित्यांची विक्री होत असल्याने पालकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या शाळांवर प्रशासनाने कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक पर्यावरण दिन । राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश
– महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय!