Dainik Maval News : लोणावळा शहरातील जुन्या टपरीधारकांचे पुनर्वसन होईपर्यंत कोणत्याही प्रकारची अतिक्रमण कारवाई लोणावळा नगरपरिषदेला करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा लोणावळा टपरी संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.
सन २००८ साली लोणावळा शहरामध्ये अतिक्रमण कारवाई राबवित साडेतीनशे टपऱ्या उध्वस्त करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार या टपऱ्यांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश लोणावळा नगरपरिषदेला देण्यात आले होते. मात्र त्याप्रमाणे अद्याप जुन्या टपरीधारकांचे पुनर्वसन झालेले नाही. तसेच २०१७ साली लोणावळा शहरातील टपऱ्या, पथारीधारक, हातगाडी धारक यांचा बायोमेट्रिक सर्वे शासनाकडून करण्यात आला आहे. जोपर्यंत या टपरी धारकांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आम्ही लोणावळा नगर परिषदेला टपरीधारकांवर कारवाई करू देणार नाही. वेळ पडली तर लोणावळा नगर परिषदेवर मोर्चा काढू, याकरिता लोणावळा शहरातील सर्व टपरीधारकांनी देखील एकत्र येऊन संघर्ष करण्याचा पवित्र घेणे गरजेचे असल्याचे मत लोणावळा शहर टपरी पथारी हातगाडी संघटनेच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आले.
- लोणावळा शहरातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्याचा विषय मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. आमदार सुनील शेळके यांच्या आढावा बैठकीमध्ये व तदनंतर लोणावळा नगरपरिषदेने माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या मागणीनुसार लोणावळा नगर परिषद प्रशासनाने घेतलेल्या दुसऱ्या आढावा बैठकीमध्ये देखील माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्याकडून मागील काही वर्षांमध्ये वाढलेल्या टपर्यांवर कारवाई करण्याची मागणी
करण्यात आली होती.
२०१७ नंतर झालेल्या टपऱ्यांवर १० मार्च पर्यंत कारवाई न झाल्यास लोणावळा नगर परिषद इमारतीसमोर टपऱ्या आणून टाकण्याचा इशारा आमदार शेळके यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने देखील कारवाई करण्याच्या मोहिमेची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर लोणावळा टपरी संघटनेच्या वतीने तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पुढील आठ दिवसांमध्ये लोणावळा शहरांमधील जुन्या व नवीन या सर्व टपऱ्यांची नोंदणी संघटने कडून केली जाणार आहे. नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर टपरी व्यावसायिक, फिरते फेरीवाले व पथारीवाले अशा तीन प्रकारे व्यवसायाचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. लोणावळ्यातील टपरी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्व पक्षीय मंडळींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा