Dainik Maval News : गेली अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणूक लढविण्याचे स्वप्न पाहिलेले आणि ‘खिसा रिकामा करून बसलेले’ इच्छुक उमेदवार आता प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाल्यानंतर अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता थेट प्रचाराच्या कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तिकीटासाठी असलेली भलीमोठी रांग पाहता, आपला नंबर लागो अथवा न लागो, जोडलेल्या जनसंपर्काच्या जोरावर इच्छुक उमेदवार दंड थोपटून तयारीत असलेले पाहायला मिळत आहे.
मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५ गट आणि पंचायत समिती मावळ च्या दहा जागा अर्थात दहा गण आहेत. या सर्वच ठिकाणी इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या पाहायला मिळत आहे. त्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या दोन दिवसांत तब्बल ११५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयातून नेले आहेत. अर्थात यात अनेक हौशे – नवशे असणारच, परंतु पहिल्या दोन दिवसांतील अर्जांची विक्री पाहता, इच्छुकांचा आकडा नक्कीच मोठा आहे, हे चित्र तर स्पष्ट झाले आहे.
मावळात सद्यस्थितीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे दोन प्रबळ पक्ष असून शिवसेना, शिवसेना उबाठा, आरपीआय, काँग्रेस (आय), वंचित बहुजन आघाडी असे इतरही पक्ष आहे. यांतील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडे सर्वाधिक उमेदवारांची गर्दी असून या गर्दीत असेही अनेक उमेदवार आहेत, जे गेली अनेक महिने अन् वर्षभरापासून ‘खिसा रिकामा करून’ निवडणुकीची तयारी करून बसले आहेत. अशात हे उमेदवार आता अधिकृत उमेदवारीची वाट न पाहता, आता लढायचंच, या भूमिकेत आलेले दिसतात.
उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिनांक अर्थात २७ जानेवारीपर्यंत ‘अधिकृत’चा शिक्का उमेदवारावर पडण्याची शक्यता असते, अनेकदा अपक्षालाही पुरस्कृत करण्याची वेळ निवडणूक काळात पक्षांवर येते, त्यामुळे आता तिकीट जाहीर होवो अथवा न होवो, पण फॉर्म भरायचा आणि तयारीत राहायचं हा फॉर्म्युला स्वीकारून अनेक उमेदवार थेट प्रचाराच्या कामाला लागल्याचे चित्र मावळ तालुक्यात दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– भाजपाचा विजयी सूर मावळमध्ये चमत्कार घडविणार? मावळ भाजपाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नवसंजिवनीची अपेक्षा
– महत्वाची बातमी ! सायकल स्पर्धेकरिता मावळमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– मावळचा लेक बनला मुंबईचा नगरसेवक ! मावळातील पारिठेवाडी येथील मंगेश पांगारे मुंबई मनपा निवडणुकीत नगरसेवकपदी विजयी
– वडगावची लढाई आणि ऐतिहासिक तह.. मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान : पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला
