Dainik Maval News : खोपोली शहरातील (ता. खालापूर) इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात विनी इंजिनिअरिंगच्या आवारात घडलेल्या घटनेत लॅब्रेडोर जातीच्या मॅक्स नावाच्या सुरक्षा कुत्र्याने अचानक आलेल्या घोरपडीवर हल्ला केला. काही वेळ भुंकून आवाराबाहेर घालवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर मॅक्सने घोरपडीला चावा घेऊन जखमी केले. प्रतिकार म्हणून घोरपडीनेही आपल्या शेपटीने मॅक्सवर फटके दिले, त्यामुळे परिसरात थरारक वातावरण निर्माण झाले होते.
घोरपड अर्धमेली झाल्यावर मॅक्स शांत झाला. यावेळी उपस्थित निलेश कुदळे यांनी मॅक्सला आवरले आणि जखमी घोरपडीला शिताफीने ताब्यात घेतले. त्यांनी तत्काळ हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली.
गुरुनाथ साठेलकर यांनी प्रवीण शेंद्रे यांच्या मदतीने घोरपडीवर प्राथमिक उपचार केले. पाणी व अल्प आहार दिल्यानंतर घोरपडीला सुरक्षित पिंजऱ्यात ठेवण्यात आले. काही तासांच्या विश्रांतीनंतर ती पुन्हा ठणठणीत दिसू लागली. अखेरीस वनक्षेत्रात तिला सोडण्यात आले.
या घटनेत सुरक्षाकामी पाळलेल्या मॅक्सने आपली जबाबदारी पार पाडली असली, तरी निलेश कुदळे व हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून दाखवलेले प्राणीप्रेम विशेष कौतुकास्पद ठरले. त्यांनी एका जखमी प्राण्याला जीवदान देत निसर्गातील प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे, असा जणू संदेश या निमित्ताने दिला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena