Dainik Maval News : कार्ला येथील आठवडे बाजारात झाड कोसळल्याची घटना शुक्रवारी (दि.31) घडली. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून एकजण गंभीर जखमी आहे.
कार्ला येथे दर शुक्रवारी आठवडे बाजार भरत असतो. शुक्रवारी जेव्हा आठवडे बाजार सुरु होता, तेव्हा दुपारच्या सुमारास अचानक आंब्याचे एक जुने झाड कोसळले. यात सहा नागरिक जखमी झाले. उपस्थितांनी तात्काळ मदतकार्य करीत त्यांना रुग्णालयात दाखल केले.
कार्ला-मळवली रस्त्यालगत असणाऱ्या मोकळ्या मैदानावर गेली वीस वर्षांपासून हा बाजार भरत आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे बाजार सुरु असताना दुपारी अचानक आंब्याचे जुने झाड वाळवी लागून पोकळ झाल्याने कोसळले. या घटनेने तिथे असलेल्या भाजी विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली.
दुर्घटनेत झाड अंगावर कोसळल्याने भीमा अनंता मावकर हे भाजी विक्रेते गंभीर जखमी झाले, तर अन्य पाच जण किरकोळ जखमी झाले. तसेच दोन वाहनांचेही नुकसान झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने व बाजारात गर्दी नसल्याने मोठी हानी झाली नाही.