जुन्या मुंबई पुणे हायवेवर मंगळवारी (दिनांक 24 जानेवारी) रात्री एक थरारक अपघात घडला. जुना पुणे-मुंबई महामार्गावर शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या खिंडीत रात्रीच्या वेळी एक दुचाकीस्वार (एक्टिवा स्कूटी) दुचाकी घसरल्याने दरीत कोसळला. अक्षय अशोक महाजन (वय 29 वर्ष, रा. सुकापूर, नवीन पनवेल) हा युवक पुण्याहून पनवेलला जात असताना दरीत कोसळला. त्याने स्वतः आपण दरीत कोसळलो असून खाली घसरत चाललो आहे, याची माहिती वडिलांना फोनद्वारे दिली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याचा शोध सुरु केला आणि लोणावळा शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लोणावळा शहर पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलत मुंबई पुणे हायवेवर त्याचा शोध सुरु केला. अक्षय दरीत कोसळला, पण नेमके कुठे हे ठाऊक नव्हते, तेव्हा शोध चालू असतानाच त्याची दुचाकी शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील दरीत घसरल्याचे समजले. त्यानंतर तिथे टीम पोहोचली तेव्हा 50 फुटांवर दुचाकी दिसून आली. मात्र, अक्षय त्याहून खोल 250 फुट दरीत होता. त्यामुळे पोलिसांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी, शिवदुर्ग मित्र लोणावळा, देवदूत टीम यांना पाचारण केले. सर्वांनी अत्यंत साहसाने आणि अथक प्रयत्नाने अक्षयला वर काढले. तसेच दुचाकी देखील वर खेचण्यात आली. ( Bike Accident Near Shingroba Temple On Old Mumbai Pune Highway Rescue By Shivdurg Mitra Team Lonavala Pune Khopoli Raigad )
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीम, देवदूत टीम, शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम, फायर ऑफिसर हरी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली अग्निशमन दल टीम, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्सचे जवान, खोपोली शहर पोलिस, लोणावळा शहर पोलिस, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा आदी यंत्रणा या कार्यात सहभागी झाल्या होत्या.
शिवदुर्ग मित्रचे योगेश उंबरे, सुरज वरे, ओंकार पडवळ, अशोक उंबरे, प्रणय अंभोरे, हर्ष तोंडे, हर्षल चौधरी, रतन सिंग, अमर ठाकर, कपिल दळवी, आनंद गावडे सर, सुनिल गायकवाड हे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि देवदूत टीमचे खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष पवार यांनी तोंडभरून कौतुक केले.
अधिक वाचा –
– नाणेघाटात तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचा थरार! शिवदुर्ग टीमची साहसी कामगिरी
– शिवसम्राट प्रतिष्ठान वर्धापन दिन आणि स्व. भाऊ लायगुडे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर; उद्घाटक सुधाकर शेळकेंचेही रक्तदान