Dainik Maval News : शनिवारी (दि. 9 ऑगस्ट) युनोद्वारा घोषित जागतिक आदिवासी दिन जगभरातील सर्व आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मावळ तालुक्यातील आदिवासी बांधव दरवर्षी मोठ्या आनंदाने हा दिवस साजरा करतात. यावर्षीही मावळ तालुक्यातील वडेश्वर येथे बिरसा ब्रिगेड मावळ, आदिवासी विचारमंच मावळ सर्व आदिवासी समाजाच्या वतीने जागतिक आदिवासी अधिकार दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुलाबराव हिले होते. प्रमुख पाहुणे काळुराम वाजे आणि दत्तात्रय रावते होते. कार्यक्रमाचे वक्ते आदि. मारुती साबळे सर (आदिवासी विचारमंच जुन्नर) हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात वडेश्वर बस स्टॅण्डवरून आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांच्या मिरवणूकीने झाली. डी. जे., ढोल लेझीम पथक आणि सजवलेल्या बैलगाडीमध्ये क्रांतिकारकांच्या वेशभूषेत असणारे तरुण लहान मुले, महिला आणि तरुणाई आदिवासी नृत्य आणि गाण्यांच्या तालावर थरकली. कार्यक्रमात आदिवासी नृत्य सादर करण्यात आली.
शिरदे येथील आदिवासी महिलांचे पारंपारिक सामूहिक आदिवासी नृत्य, कळकराई येथील महिलांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जीवनावर सुंदर असं मौखिक गीत सादर केले. इयत्ता 10 /12 वीत उत्तुंग यश मिळवलेल्या आदिवासी विद्यार्थी यांचा पुस्तक, प्रतिमा आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. नवनियुक्त आदिवासी नोकरदारांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मारुती साबळे सरांनी आजच्या आदिवासी तरुणांसमोरील आव्हाने यावर आपली रोखठोख मते मांडली. आदिवासी तरुणांनी शिक्षण, उद्योग व्यवसाय यामध्ये स्वतःला सिद्ध केले पाहिजे. समाजासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपले प्रश्न आपणच सोडवण्यासाठी मार्ग शोधले पाहिजे असं मत मांडले.
कार्यक्रमाचे स्वागत दत्ताभाऊ चिमटे, सूत्रसंचालन आदि. सोमनाथ हिले यांनी तर प्रास्ताविक निलेश साबळे यांनी केले. किरण हेमाडे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमा नंतर वडेश्वर ग्रामस्थांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी वडेश्वर गावचे ग्रा. सदस्य, सरपंच, पो. पाटील सर्व ग्रामस्थ, बिरसा ब्रिगेड मावळ, आदिवासी विचारमंच मावळ के. ए. ग्रुप मावळ सर्वांनी सहकार्य केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर