Dainik Maval News : जोपर्यंत आंबी – मंगरुळ – आंबळे – निगडे या रस्त्याचे काम होत नाही, तोपर्यंत या मार्गावर अवजड वाहतूकीला पूर्णतः बंदी करावी असा आक्रमक पवित्रा घेत या गावातील नागरिकांनी सोमवारी मंगरूळ येथे रास्ता रोको आंदोलन केले. तसेच, आंबी ते निगडे रस्त्याच्या कामाला 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र रस्ता रुंदीकरण करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात, त्यांना मोबादला त्वरित मिळावा, त्यानंतर रस्त्याचे काम सुरू करावे. तोपर्यंत अवजड वाहनांना मार्गावर बंदी घालावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
मावळ तालुक्यातील आंबी एमआयडीसीमधील आंबी ते मंगरूळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन केले जाते. त्यामुळे येथून सतत होणाऱ्या अवजड मालवाहू वाहनांच्या येण्या जाण्याने हा रस्ता सामान्य नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. त्या विरोधात आजवर अनेकदा निवेदन देत आवाज उठवल्यानंतर सोमवारी स्थानिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. ( Block the way of local villagers on Ambi Nigde road demand ban on heavy traffic )
अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली. नियमबाह्य वाहतूक करत रस्त्याची दुर्दशा तर केलीच आहे, सोबत या मार्गाने प्रवास करणारे विद्यार्थी, कामगार, प्रवासी नागरिक, शेतकरी या सर्वांनाच या अवजड वाहनांच्यामुळे त्रास सहन करावा लागतोय. रस्ता त्यामुळे जीवघेणा बनला आहे. वाहतूक कोंडी देखील अनेकदा होत असते. आजवर सहा ते सात नागरिकांचा या रस्त्यावर अवजड वाहनांमुळे बळी गेल्याचे नागरिक सांगतात.