Dainik Maval News : दहावी आणि बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.11 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे महत्वाचे आदेश दिले.
सदर बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री देखील उपस्थित होते. बारावीची परीक्षा आजपासून (दि.11 फेब्रुवारी) 18 मार्चपर्यंत कालावधीत 3,373 परीक्षा केंद्रावर होणार आहे. दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च कालावधीत 5,130 परीक्षा केंद्रावर होणार आहे. यासाठी सर्व तयारी केली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व 100 मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षीत आहे, अशा सूचना दिल्या.
सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी, बैठ्या पथकाने परीक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास परीक्षा केंद्रावर पोहोचावे व परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे, संवेदनशील केद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठ्या पथकात नेमणूक करावी, असेही त्यांनी सांगितले.
- संवेदनशील परीक्षा केद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आणि व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे पूर्णवेळ निगराणी करावी, सर्व तालुक्यातील परिक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त, बैठी पथके, ड्रोन आणि व्हिडीओ कॅमेरे कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिका-यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग-प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी, अशा सूचना दिल्या.
परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील. शहरी भागात पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहील, त्यानुसार कामकाज करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. इंग्रजी भाषा, गणित आणि विज्ञान विषयांच्या परीक्षे दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वत: भेटी द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले..
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ