Dainik Maval News : विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणून तळेगाव पोलीस स्टेशनच्या भरारी पथकाला माझ्या कार्यालयातून जप्त करायला लावलेली 36 लाख रुपयांची रोख रक्कम ही माझ्या व्यवसायाची असून त्याबाबत आपण प्राप्तिकर खात्याकडे संपूर्ण हिशेब सादर केलेला आहे, असे स्पष्टीकरण सोमाटणे येथील उद्योजक सचिन मुऱ्हे यांनी केले आहे.
सचिन मुऱ्हे हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांचा स्टीलचा व्यापार देखील आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती देऊन आपल्या कार्यालयावर व घरावर छापा टाकण्यासाठी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दबाव आणला. तसेच घरात घुसून दमदाटी करीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुऱ्हे कुटुंबीयांनी केला आहे.
आपण गेले कित्येक वर्षे व्यवसाय करीत असून प्रामाणिकपणे शासनाचे सर्व कर भरत आहे. माझ्या व्यवसायाचा पैसा कार्यालयात नेहमीच असतो. त्याचे सर्व हिशेब मी प्राप्तिकर खात्याला सादर केले आहेत. संदर्भात कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, असे सचिन मुऱ्हे म्हणाले.
आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काम करतो. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांचे काम करीत आहे. त्यामुळे राजकीय सूड भावनेतून विरोधकांनी पोलिसांना ही कारवाई करण्यास भाग पाडले. पराभवाला घाबरून विरोधक प्रामाणिक व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करीत सचिन मुऱ्हे यांनी विरोधकांच्या प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वातावरण तापलं ! मावळात शेळके आणि भेगडे यांचे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात
– कार्ला, कुसगाव, ओळकाईवाडी येथे लोणावळा ग्रामीण पोलिसांचे सशस्त्र पथ संचलन । Lonavala Police
– दुकाने, मॉल आणि महिला बचत गट येथील कामगार वर्गात मतदान करण्याविषयी जनजागृती