Dainik Maval News : मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले आणि उपसभापती अमोल भोईरकर यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे सादर केले आहेत. शनिवारी (दि.२१) झालेल्या संघाच्या बैठकीत दोन्ही पदाधिकारी यांनी आपले अधिकृत राजीनामे सादर केले. या राजीनाम्यासह संघाच्या नेतृत्व बदलाच्या राजकारणाची सुरूवात झाली असून नवीन कारभारी म्हणून कुणाची वर्णी लागणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मार्च २०२४ मध्ये मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची निवडणूक पार पडली होती. त्यावेळी सभापतीपदी शिवाजी असवले आणि उपसभापतीपदी अमोल भोईरकर यांची बिनविरोध निवड झाली होती. निवडीनंतर संघातील सर्व सदस्यांना कामाची समान संधी मिळावी या उद्देशाने पदांचा कार्यकाळ वाटून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परंतु राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलांचा परिणाम स्थानिक सहकार क्षेत्रावरही झाला. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीमुळे स्थानिक पातळीवरील समीकरणे बदलली. पक्षातील मोठा गट बाहेर पडल्याने संघातील पदांच्या फेरबदलाचे ठरलेले वेळापत्रक प्रभावीपणे राबवता आले नाही. परिणामी अनेक इच्छुक सदस्यांची संधी पुढे ढकलली गेली.
अशा परिस्थितीत शनिवारी झालेल्या सभेत सभापती आणि उपसभापती यांनी राजीनामे दिल्याने नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निर्णयामुळे संघातील इच्छुक सदस्यांच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत. मावळ तालुक्यात सहकार क्षेत्र हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. खरेदी-विक्री संघाचा शेतकरी आणि व्यापारी वर्गाशी थेट संबंध असल्याने त्याच्या नेतृत्वातील बदलाला विशेष महत्त्व प्राप्त होते.
मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, सहकार महर्षी माऊली दाभाडे, सहकार भूषण बबनराव भेगडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या भूमिकेतून पुढील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संघातील सत्तासमीकरणे, राजकीय पाठबळ आणि सहकार क्षेत्रातील समन्वय या घटकांचा विचार करूनच नव्या सभापती व उपसभापतीची निवड होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय आणि सहकारी वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
राजीनाम्यानंतरची औपचारिक प्रक्रिया, निवडणुकीचे वेळापत्रक आणि उमेदवारांची अंतिम निवड या सर्व बाबी स्पष्ट झाल्यानंतरच संघाच्या नेतृत्वाचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– माझी वसुंधरा अभियान 5.0 : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा विभागस्तरीय प्रथम क्रमांक ; 75 लाख रुपयांचे पारितोषिक
– मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार यांच्याकडून पदाचा राजीनामा
– सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड