Dainik Maval News : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची धर्मादाय रुग्णालयांकडून अंमलबजावणी होत नसल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
- दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कथित प्रकरणाची पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात येईल. या समितीत उपसचिव, सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष – मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय समूहाचे अधीक्षक, तसेच विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील.
याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धर्मादाय रुग्ण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंमलबजावणी बाबतही प्रधान सचिव विधी व न्याय विभाग तसेच धर्मादाय आयुक्त यांनी संनियत्रण व नियमन करावे याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
या निर्देशात म्हटले आहे की, धर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची’ मान्यता घ्यावी. याबाबत धर्मादाय रुग्णालयांना तत्काळ निर्देश देण्यात यावेत. विधी व न्याय विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी अहवाल व समितीच्या शिफारशी सादर केल्या आहेत. त्या शिफारशींवर तत्काळ कार्यवाही करावी.
- शासनामार्फत धर्मादाय रुग्णालयांमध्ये 186 धर्मादाय आरोग्य सेवकांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांवरील भरती तत्काळ करण्यात यावी. निर्धन रुग्णनिधी (IPF) खात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेवून ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी. योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुणालयांवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करावी.
महिलेच्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चौकशीचे आदेश
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल.
या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number