पंढरपूर (सोलापूर) : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दिनांक 29 जून) आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या चरणी घातले.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दांपत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते. ( CM Eknath Shinde Concluded Official Mahapuja of Shri Vitthal on Ashadhi Ekadashi 2023 Pandharpur )
सावळें सुंदर रूप मनोहर… आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रखुमाईची विधीवत शासकीय महापूजा.. pic.twitter.com/61admr2zRJ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2023
अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्य मानाचे वारकरी –
मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी कुटुंबातील भाऊसाहेब मोहनीराज काळे (वय ५६) मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) मु. पो. वाकडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर या वारकरी दांपत्यास शासकीय पूजेचा मान मिळाला. काळे दांपत्य २५ वर्षापासून भास्करगिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी दांपत्यास एक वर्षासाठी मोफत प्रवासाची सेवा दिली जाते. त्या मोफत पासचे वितरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या वारकरी दांपत्यास करण्यात आले.
अधिक वाचा –
– दैनिक मावळ विशेष । देवशयनी आषाढी एकादशी – “कर्म आणि भक्ती यांचा संगम”
– महागाव इथे कृषि संजिवनी मोहिम प्रशिक्षण कार्यक्रम; शेतकऱ्यांना चारसुत्री पद्धतीने भात लागवडीबाबत मार्गदर्शन