Dainik Maval News : सकाळचे १० वाजलेले…, जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वत्र आनंदी चेहरे दिसत होते, डोळ्यात वेगळीच चमक… चर्चा होती ती आता आपल्याला हक्काची नोकरी मिळणार… तीही सन्मानाने… राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या ऑनलाइन उपस्थितीत व जिल्ह्यातील कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते आपल्याला नियुक्ती पत्रे मिळणार…! हा प्रसंग होता, आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यातील.
राज्य शासनाच्यावतीने अनुकंपा धोरणानुसार गट क व गट ड संवर्गात नियुक्ती तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी राज्यभरात सर्व जिल्ह्यात रोजगार मेळावा घेऊन नियुक्तीपत्रे देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यात सुमारे दहा हजाराहून अधिक उमेदवांराना नियुक्तीपत्रे देण्यात येणार होती. हा त्यांच्या जीवनातील स्वप्नपूर्तीचा क्षण होय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर आंनद ओसाडून वाहत होता….आपल्या पसंतीक्रमानुसार कार्यालय मिळाल्याने ते समाधानाची भावना व्यकत करीत होते.. नवीन नोकरीच्या माध्यमातून समाज, देशसेवा करण्याची संधी मिळण्यासोबतच रोजगाराचे हक्काचे साधन मिळाल्याने कुटुंबाला जगण्याचा आधार मिळाल्याची भावना व्यक्त करीत होते.
पुणे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यामध्ये अनुकंपा तत्त्वावर गट क मध्ये १५५ उमेदवारांना २९ आस्थापनांमध्ये आणि गट ड मधील २४४ उमेदवारांना २७ आस्थापनांमध्ये अशा एकूण ३९९ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेद्वारे निवड झालेल्या ३७२ उमेदवारांना ४१ आस्थापनांमध्ये नियुक्ती देण्यात आली. याप्रमाणे एकूण ७७१ उमेदवारांना ६५ आस्थापनांमध्ये नियुक्ती देण्यात आली.
यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यातील खुल्या प्रांगणात, तसेच पाचव्या आणि चौथ्या मजल्यावरील सभागृहांमध्ये, बैठक कक्षात व्यवस्था करण्यात आली होती. संबंधित आस्थापनांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येत असल्याची खात्री करत होते. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी व्यवस्थेची पाहणी करत होते.
मोनिका ढगे : ‘संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविल्याबद्दल राज्यशासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आभार मानते. एक मुलगी म्हणून स्वत:च्या पायावर उभी राहून कुटुंबाला मदत करता येईल, याचा मला मनापासून आनंद होत आहे.’
अर्चना कोंढवळे : ‘माझ्या पतीचे दुःखद निधन झाल्यानंतर माझ्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी येऊन पडली. माझ्या कुटुंबात सासू-सासरे आणि एक मुलगी आहे. राज्यशासनाच्या १५० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमामुळे मला खूप चांगला आधार मिळाला असून ग्राम महसूल अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मी सरकारची खूप खूप आभारी आहे.’
पुनम पुंडे : ‘माझे बाबा पाटंबधारे विभागात कार्यरत असतांना सन १९९६ या वर्षी निधन झाले, कोविडच्या काळात माझ्या पतीचेही निधन झाले. राज्य शासनाच्या अनुकंपा धोरणामुळे मला जगण्याचे बळ मिळाले असून जीवनाला कलाटणी मिळणार आहे. याकरिता राज्य शासनाची आभारी आहे.’
पवनकुमार शितोळे : ‘माझ्या वडीलांचे दोन वर्षापूर्वी निधन झाले असून त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षात मला राज्यशासनाने नियुक्ती दिली आहे. यामुळे माझे कल्याण झाले असून मला कुटुंबाचा सांभाळ करण्याची उर्जा मिळाली, याबद्दल राज्य शासनाचे आभार मानतो’
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय